बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे आज जगभरात असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. उत्तम अभिनयाच्या जोरावर शाहरुखने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. परंतु, नाव, प्रसिद्ध कमावण्यापूर्वी शाहरुखने अत्यंत हालाखीचे दिवस काढले आहेत. बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करण्यापूर्वी त्याला बराच स्ट्रगल करावा लागला. यात मुंबईमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या शाहरुखला येथे अनेक वेगवेगळे अनुभव आले. यातला पहिला अनुभव त्याला मुंबई लोकल ट्रेनचा आला. पहिल्यांदाच लोकलने प्रवास करणाऱ्या शाहरुखला एका महिलेने चक्क सगळ्यांसमोर कानशिलात लगावली होती. एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं आहे.
2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करत असताना शाहरुखने त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने कानशिलात लगावली होती असं सांगितलं.
"मी पहिल्यांदाच ट्रेनने मुंबईत आलो होतो. दिल्लीतून मुंबईत येणारी ट्रेन इथे आल्यावर लोकल होते हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मी लोकलमध्ये जिथे बसलो होतो ती जागा कोणालाच द्यायला तयार नव्हतो. ही माझी जागा आहे आणि यासाठी मी पैसे दिलेत असंच मी सगळ्यांना सांगत होतो. पण, एका महिलेला मी माझी जागा दिली", असं शाहरुख म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या महिलेला माझी जागा देत असताना मी तिला सांगितलं की, या जागेवर फक्त तुम्ही बसू शकता पण तुमच्यासोबत अन्य कोणत्याही व्यक्तीला मी इथे बसू देणार नाही. माझ्या या वाक्यावर त्या महिलेने मला जोरदार कानाखाली लगावली. आणि, ही जागा तुझ्या एकट्याची नाही सगळ्यांसाठी आहे असं सांगितलं."
दरम्यान, शाहरुखने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला आहे. मात्र, यशाची एक एक पायरी चढत आज तो बॉलिवूडवर राज्य करतांना दिसतो. शाहरुख लवकरच पठाण या आगामी च्त्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतं. तसंच जवान, डंकी या चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे.