Join us

Pathaan : ना ‘बिग बॉस’, ना कपिल शर्मा...; शाहरूखचे ‘पठाण’च्या प्रमोशनसाठी नकारच नकार, असं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 6:36 PM

Shahrukh Khan, Pathaan : सध्या ‘पठाण’ची जबरदस्त हवा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण यावेळी एसआरकेच्या प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे...

Shahrukh Khan,  Pathaan : २०१८ साली शाहरूख खानचा ‘झीरो’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा आला अन् दणकून आपटला. तेव्हापासून शाहरूख मोठ्या पडद्यापासून दूर होता. पण आता शाहरूख ‘पठाण’ घेऊन येतोय. होय, त्याचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहांत धडकणार आहे. सध्या ‘पठाण’ची जबरदस्त हवा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण यावेळी एसआरकेच्या प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे. होय, ना कुठल्या मीडिया प्लॅटफाॅर्मला मुलाखत, ना रिॲलिटी शो वा चॅट शोमध्ये एन्ट्री. अगदी शाहरूखने ‘बिग बॉस १६’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ शोमध्ये येण्यासही नकार दिला आहे.

चर्चा खरी मानाल तर,  ‘बिग बॉस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’सारख्या कार्यक्रमात ‘पठाण’चं प्रमोशन होणार नसल्याचं कळतंय. ‘पठाण’मध्ये सलमानचा कॅमिओ आहे. पण असं असूनही भाईजान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’च्या मंचावर यंदा शाहरुखच्या ‘पठाण’चं प्रमोशन होणार नसल्याची माहिती आहे. कपिल शर्माकडूनही शाहरुख खानला बरीच विचारणा झाली, पण शाहरुख खानच्या टीमने त्याच्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचं कळतंय. आता असं का, तर वाद. होय, अशा कार्यक्रमांमधून वा मुलाखतीमधून निर्माण होणाऱ्या वादापासून दूर राहण्यासाठी निर्मात्यांनी प्रमोशनची ही नवी स्ट्रॅटेजी स्वीकारल्याची चर्चा आहे.  

तुम्हाला ठाऊक आहेच की, वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘पठाण’चं पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झालं आणि या पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीने रान पेटलं. शाहरूख, दीपिका यांनी अद्याप या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही. एकंदर काय तर, एक वाद झाला तो पुरे झाला, आता आणखी नको, असंच ‘पठाण’च्या टीमने ठरवलेलं दिसतं.

‘पठाण’ वादात सापडला असला तरी या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा आहे. ॲडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा ट्रेंड बघता ‘पठाण’  पहिल्या दिवशी ४० कोटीची कमाई करू शकतो अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे.  ‘पठाण’मध्ये शाहरुखबरोबर दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानबिग बॉसद कपिल शर्मा शो