शाहरुख खान फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर तो खऱ्या आयुष्यातही किंग आहे. त्याच्या उदारतेची किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. कोरोना महामारीमध्ये शाहरुख खानने वेगवेगळ्या शहरांतील लोकांना मदत केली होती. त्याचे मुंबईतील कार्यालय कोविड सेंटर म्हणून वापरण्यासाठी दिले होते. दरम्यान आता शाहरुखबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे त्याने दिल्लीमध्ये अपघातात जीव गमावलेल्या अंजलीच्या कुटुंबियांना मदत करण्याची घोषणा केली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कंझावालामध्ये अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला कार चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेले होते. या अपघातात तिचा मृत्यू झाला. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला. अंजली ही तिच्या घरातील एकमेव कमावती सदस्य होती. अशा परिस्थितीत अंजलीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यांच्या मदतीसाठी शाहरुख खानचे मीर फाउंडेशन पुढे सरसावले आहे. तिच्या आईच्या उपचारासाठी मदत करणार आहे. तसेच तिच्या भाऊ बहिणीला देखील पुरेशी मदत केली जाणार आहे.
३१ डिसेंबरला झाला अपघात३१ डिसेंबर, २०२२च्या रात्री अंजली सिंग तिची मैत्रीण निधीसोबत स्कूटीवरून घराकडे निघाली होती. कंझावाला रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. निधी या धडकेतून वाचली, मात्र अंजली गाडीखाली अडकली. या वाहनात बसलेल्या तरुणांनी अंजलीला सुमारे १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.