मेरिल स्ट्रीपच्या भाषणाचा शाहरुख खानला एवढा राग का आला?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 1:51 PM
मेरिल स्ट्रीप यांनी गोल्डन ग्लोबमध्ये दिलेल्या भाषणामुळे चिडलेल्या शाहरुख खानने मी तिची कॉपी का करू असे म्हणून राग व्यक्त केला. हे नेमके काय प्रकरण आहे ते जाणून घेण्यासाठी वाचा...
नुकतेच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये जीवनगौरव सन्मान स्वीकारताना जेष्ठ हॉलीवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांच्यावर टीका करणारे भाषण करून जगभरातील मीडिया व स्वातंत्र्यवादी विचारवंताची वाहवाह मिळवली. परंतु यामुळे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला खूप राग येतो आहे.आता तुम्ही म्हणाला मेरिल स्ट्रीपच्या भाषणामुळे किंग खानला राग येण्याचे काय कारण? तर त्याचे झाले असे की, एका कार्यक्रमात त्याला स्ट्रीप यांनी निडरपणे केलेल्या भाषणाचे उदाहरण देऊन ‘भारतीय सेलिब्रेटी असे मुक्तपणे विचार का मांडत नाहीत’ असे विचारले तेव्हा तो पुरता चिडला.तो म्हणाला, ‘मेरिल जे बोलली ते सगळ्यांनीच बोलले पाहिजे. केवळ सेलिब्रेटींनीच तसे वागले पाहिजे असा आग्रह का केला जातो? मला जर एखाद्या नि:पक्षपाती पत्रकाराने विचारले तर मी त्याला नक्कीच माझी खरी प्रतिक्रिया देईन. पण मी जे बोलतो त्याला मोडून-तोडून वाद कसा निर्माण होईल असे मीडियाचे प्रयत्न असतात. त्यामुळे मी कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. मी कशावर बोलायचे हे तुम्ही मला नाही सांगू शकत. मेरिल जे बोलली ते तुम्हाला आवडले असेल तर ते परत परत ऐका. पण ती बोलली म्हणून मी बोललो पाहिजे अशी अपेक्षा करू नका.’याविषयावर आणखी विचारले असता तो म्हणाला, ‘भारतात लोकांची मानसिकता वेगळी आहे. अमेरिकेतील पत्रकारिता आणि आपल्याकडील पत्रकारिता यामध्ये खूप फरक आहे. आणि तसेही प्रत्येक विषयावर मी बोललेच पाहिजे असेसुद्धा नाही ना. मी अभिनेता आहे, कोणी भाषण देणारा नेता नाही. त्यामुळे लगेच ‘शाहरुख यावर गप्प का?’ असा गाजावाज का म्हणून केला जावा? मी जेव्हा जेव्हा मुक्तपणे माझे विचार मांडले त्याचा नंतर मला पश्चातापच झाला आहे.’ यावेळी शाहरुखचा पत्रकारांवर विशेष राग दिसून आला. त्याने म्हटले की, ‘भारतातील पत्रकारांना आता कुठे लोकप्रियता मिळत आहे. स्टारडमची चव ते चाखताहेत. पण जेव्हा त्यांच्या डोक्यातून ही हवा जाऊन मी जे काही म्हणतो त्याचा आदर करून त्यात कोणताही बदल न करता ते सांगण्याची त्यांची वृत्ती होईल तेव्हा मी बोलेल, प्रत्येक गोष्टीवर प्रामाणिक प्रतिक्रिया देईल.’एका अर्थाने त्याचेही बरोबर आहे. आतापर्यंत शाहरुख त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकलेला आहे. ‘आयपीएल’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्याला त्याने विरोध केल्यामुळे त्याला मोठ्या रोषाला समोरे जावे लागले होते. तसेच मध्यंतरी ‘असहिष्णुते’बाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ‘धर्मनिरपेक्ष नसणे हा या देशातील सर्वात मोठा गुन्हा आहे’ असे तो म्हणाला होता. परंतु शाहरुखने ‘भारतात धार्मिक असहिष्णुता आहे’ असे म्हटले असा त्याचा अर्थ काढण्यात आला. याचा परिणाम म्हणजे त्याच्या ‘दिलवाले’ चित्रपटावर अनेकांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.तुम्हाल काय वाटते शाहरुख बरोबर बोलला की चूक? खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला तुमचे मत कळवा.