आठवड्यापूर्वीच ओटीटीवर ‘बेताल’ या हॉरर वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली होती. पण तूर्तास शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने प्रोड्यूस केलेली ही वेबसीरिज एका वादात सापडली आहे. होय, या वेबसीरिजची कथा चोरीची असल्याचा आरोप होत आहे.मराठी लेखक समीर वाडेकर आणि महेश गोसावी या दोघांनी शाहरूखने त्यांच्या ‘वेताळ’ या चित्रपटाची कथा चोरून ही वेबसीरिज बनवली असल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण कोर्टातही पोहोचले आहे.
दोन्ही लेखकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत ‘बेताल’च्या वर्ल्ड प्रीमिअरवर बंदी आणण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत, मुंबई हायकोर्टाने रिलीजला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाने ‘बेताल’च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. आज 24 मे रोजी विनीत कुमार व आहना कुमारा स्टारर ही वेबसीरिज रिलीज होत आहे. निखील महाजन व ब्रिटीश लेखक व दिग्दर्शक पॅट्रिक ग्राहम यांनी सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
विनीत कुमार सिंग, अहाना कुमरा, जितेन्द्र जोशी, सिद्धार्थ मेनन यात मुख्य भूमिकेत आहेत. या थ्रीलर-हॉरर वेबसीरिजच्या कथेबद्दल सांगायचे तर बेताल नावाच्या एका पहाडाची ही कथा आहे. बेताल नावाचा हा पहाड शापित असल्याचे लोक मानत असतात. याच शापित पहाडावरची अनेक वर्षे बंद असलेली एक गुफा उघडली जाते आणि झोंबीची एक फौज त्यातून बाहेर पडते. पोलिसांची एक तुकडी झोम्बीच्या या फौजेशी लढायला पोहोचते.या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता विनीत कुमार याला तुम्ही याआधी ‘मुक्काबाज’ व ‘सांड की आंख’ या सिनेमात पाहिले असेल. तर अहाना कुमरा हिला ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’मध्ये पाहिले असेल.
काय आहे आरोपसमीर वाडेकर आणि महेश गोसावी यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांनी आपल्या ‘वेताळ’ या सिनेमाची स्क्रिप्ट वर्षभरापूर्वी रजिस्टर केली होती. यानंतर जुलै 2019 मध्ये ‘बेताल’चे शूटींग सुरु झाले. समीर व महेश यांनी सांगितले की, आम्ही आमच्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अनेक निर्मात्यांकडे गेलोत. रेड चिलीजसोबत आमची कुठलीही चर्चा झाली नव्हती. पण आमच्या चित्रपटाची कल्पना आणि आमच्या चित्रपटातील अनेक दृश्ये चोरली गेली आहेत. अद्याप रेड चिलीजकडून याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.