शक्ती कपूर यांचा 3 सप्टेंबर म्हणजेच आज वाढदिवस असून त्यांचा जन्म 1952 ला दिल्लीमध्ये झाला. त्यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर असे आहे. पण चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्यांनी शक्ती असे नाव ठेवले. शक्ती यांनी गेल्या चार- पाच दशकांमध्ये अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. खलनायकाच्या, विनोदी कलाकाराच्या भूमिकेत ते आजवर झळकले आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या आहेत. तसेच त्यांचे संवाद देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत.
शक्ती कपूर दिल्लीतच लहानाचे मोठे झाले. त्यांनी तेथील किरोडीमल कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्यातील एफटीआईआईमधून अभिनयाचे धडे गिरवले. शक्ती यांच्या वडिलांचे दिल्लीतील कनॉट प्लेस या भागात एक टेलरिंगचे दुकान होते. त्यांच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हते. त्यामुळे चित्रपट, चित्रीकरण हे सगळे त्यांच्या पालकांसाठी नवीन होते. त्यांच्या इंसानियत के दुश्मन या चित्रपटाच्या वेळी घडलेला किस्सा शक्ती कपूर त्यांच्या अनेक मुलाखतीत ते आवर्जून सांगतात. त्यांची आई हा चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती. पण शक्ती नायिकेवर बलात्कार करतात हे पाहून त्यांना प्रचंड राग आला होता. संपूर्ण चित्रपट न पाहाताच त्या चित्रपटगृहातून निघून गेल्या होत्या. वडिलांनी देखील त्यांना हा चित्रपट पाहून खडे बोल सुनावले होते. तू चित्रपटात केवळ मुलींना छेडण्याचेच काम करतोस. काही तरी चांगले काम कर... असे त्यांनी त्यावेळी शक्ती यांनी सुनावले होते.
शक्ती त्यांच्या दारुच्या व्यसनामुळे नेहमीत वादात राहिले आहे. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते आणि त्यामुळे त्यांची मुलगी श्रद्धा कपूर त्यांचा तिरस्कार करत असे असे देखील म्हटले जाते. बिग बॉस या कार्यक्रमात शक्ती स्पर्धक म्हणून गेले असता एक महिना ते दारुपासून पूर्णपणे दूर राहिले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला होता.
शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये कादर खान यांच्यासोबत काम केले आहे. कादर खान यांनाच ते आपले गुरू मानतात.