700 वर चित्रपटांत काम करणारे बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस. सुरुवातीला खलनायक आणि नंतर विनोदी भूमिका साकारणा-या शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. 3 सप्टेंबर 1958 रोजी दिल्लीमधील पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शक्ती यांचे वडील टेलर होते.
सुरुवातीच्या काळात शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटांत लहानमोठ्या भूमिका साकारल्या. पण त्यांना खरा ब्रेक दिला तो सुनील दत्त यांनी. सुनील दत्त मुलगा संजय दत्तसाठी ‘रॉकी’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. याच चित्रपटात शक्ती यांना खलनायकाची भूमिका मिळाली आणि शक्ती हे नावही. होय, सुनील दत्त यांनीच सुनील सिकंदरलाल कपूर हे त्यांचे नाव बदलून त्यांचे शक्ती कपूर हे नवे नामकरण केले होते. पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.
रॉकी या सिनेमानंतर कुबार्नी, हिम्मतवाला अशा सारख्या अनेक सिनेमांत शक्ती कपूर खलनायकाच्या भूमिकेत झळकले. 80 आणि 90च्या दशकात खलनायक म्हटले की, शक्ती कपूर किंवा अमरीश पूरी ही दोनच चेहरे दिसायचे. खरे तर शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारल्या. ब-याच चित्रपटांत सकारात्मक भूमिकाही केल्यात. पण तरीही खलनायक म्हणूनच ते ओळखले गेले.
एकदा शक्ती कपूर आपल्या आई-वडिलांना ‘इन्सानियत का दुश्मन’ हा त्यांचा सिनेमा पाहायला घेऊन गेलेत. या चित्रपटात शक्ती कपूर यांचा एक रेप सीन होता. हा रेप सीन पाहून शक्ती यांची आई इतकी भडकली होती की, ती उठून सिनेमागृहाच्या बाहेर पडली. यानंतर वडिलांनीही शक्ती कपूर यांना सुनावले होते. ‘मेरे आगोश’ या सिनेमात शक्ती यांनी सर्वाधिक वादग्रस्त सीन दिला होता. हा सीन इतका वादग्रस्त होता की, सेन्सॉर बोर्डाने अनेक महिने तो पास केला नव्हता.
शक्ती कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची मोठी बहीण शिवांगीसह लग्न केले. पहिल्या भेटीत शक्ती शिवांगी यांच्या प्रेमात पडले होते. पहिल्या भेटीनंतर शक्ती आपल्या स्पोर्ट कारमधून शिवांगी यांना फिरायला घेऊन गेले. पुढे शिवांगी या सुद्धा शक्ती यांच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्न केले.
2005मध्ये एका स्टिंग आॅपरेशनदरम्यान शक्ती कपूर कास्टिंग काउचमध्ये अडकले. एका न्यूज चॅनलने हे स्टिंग आॅपरेशन केले होते. यात शक्ती कपूर एका महिला पत्रकाराला करिअर उभे करण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखून सेक्सची डिमांड करताना दिसले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत शक्ती यांनी स्वत:वरचे सगळे आरोप नाकारत, त्या महिला पत्रकारानेच आपल्याला गोड-गोड बोलून फसवल्याचे म्हटले होते.