९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे अभिनेता महेश आनंद यांचे काल ९ फेब्रुवारीला निधन झाले. यारी रोड येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून दारावरची बेल वाजवूनही घरातून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांत आत प्रवेश केला असता त्यांना महेश आनंद यांचा मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या बाजूला दारूचा रिकामा ग्लासही आढळून आला.
महेश आनंद यांनी शहेनशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले होते. पण गेल्या १८ वर्षांत त्यांच्या हाताला काम नव्हते. १८ वर्षांनंतर निर्माते पंकज निहलानी यांनी आपल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात त्यांना ६ मिनिटांची भूमिका दिली होती. या चित्रपटात शक्ती कपूरही होते. महेश आनंद यांच्या निधनानंतर शक्ती कपूर यांनी त्यांच्याबद्दल काही धक्कादायक माहिती दिली. तब्बल १८ वर्षे काम मिळत नसल्याने महेश आनंद डिप्रेशनमध्ये गेला होता. याच नैराश्यात त्याला दारूचे व्यसन लागले होते. नशेतचं तो अनेकांना फोन करायचा, असे शक्ती कपूर यांनी सांगितले.
निहलाज यांनी महेशला ‘रंगीला राजा’त एक भूमिका दिली होती. ही भूमिका त्याने चांगल्याप्रकारे वठवली. पण शूटींगपूर्वी पहलाज यांनी महेशला मद्यसेवन न करण्याची तंबी दिली होती. पण तरिही महेश जुमानला नाही, असेही त्यांनी सांगितले. महेश आनंद यांनी अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत पहलाज निहलानींचे आभार मानले होते. १८ वर्षांपासून मला कुणी काम देत नव्हते. एक दिवस निहलानींचा मॅसेज आला. मी त्यांना कॉल केला असा, बेटा, आॅफिसला ये, असे त्यांनी मला सांगितले. पण माझ्याकडे त्यांच्या आॅफिसला जायला आॅटोचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते, असे त्यांनी सांगितले होते.