कपूर घराण्याच्या चार पिढ्या अभिनय क्षेत्रात आहेत. कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्याने अभिनयक्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण शिक्षणाच्या क्षेत्रात कपूर घराण्यातील कुणीही फार चमक दाखवू शकलं नाही. कुणाचीही शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय नाही. त्यामुळेच रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) दहावी पास झाला तेव्हा घरात जल्लोषाचं वातावरण होतं. अगदी घरी पार्टी झाली होती. होय, ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये खुद्द रणबीरने हा खुलासा केला.नुकताच ‘शमशेरा’च्या (Shamshera ) प्रमोशनल व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली सिंगसोबत दिसला. या व्हिडीओत रणबीर त्याच्या शिक्षणाबद्दल बोलतोय.
तो म्हणाला, ‘मी अभ्यासात फार काही चांगला नव्हतो. पण पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर यांच्यासह आमच्या घरातील सर्व मुलांमध्ये 10 वी पास करणारा मी पहिला मुलगा होतो. दहावीत मला 53.4 टक्के गुण मिळाले होते. माझा रिझल्ट आला तेव्हा माझं कुटुंब अगदी खूश्श होतं. त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांनी माझ्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती. मी पास होईल, अशी अपेक्षा त्यांना नव्हती. म्हणूनच सगळे जाम आनंदात होते. मी आमच्या कुटुंबातला दहावी पास करणारा पहिला मुलगा होतो.’ दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने विज्ञान किंवा गणित घेतलं होतं का? असं डॉली व्हिडीओत रणबीरला विचारते. यावर, नाही मी अकाऊंट्स घेतलं होतं, असं त्याने सांगितलं. रणबीरने 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो त्याच्या कुटुंबातील सर्वात शिक्षित व्यक्ती आहे. तो म्हणाला होता की, शिक्षणाच्या बाबतीत माझा कौटुंबिक इतिहास इतका चांगला नाही. माझे वडील 8 वी फेल आहेत. काका 9 वी फेल आणि माझे आजोबा 6 वी फेल आहेत. त्यामुळे मी माझ्या कुटुंबात सर्वाधिक शिकलेला व्यक्ती आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रणबीरने परदेशात अभिनय आणि चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतलं.
रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लव रंजनच्या एका चित्रपटात तो झळकणार आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘अॅनिमल’ असे त्याचे चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होत आहेत. शमशेरा हा येत्या 22 जुलैला प्रदर्शित होत आहे. यात रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत.