जान्हवी कपूरच्या गुंजन सक्सेना बायोपिकद्वारे तिची ही बहीण करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 06:30 PM2019-05-20T18:30:08+5:302019-05-20T18:31:08+5:30
गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाद्वारे सोनमची एक बहीण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
जान्हवी कपूर सध्या तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात चांगलीच व्यग्र आहे. धडक या तिच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. यानंतर आता ती महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाद्वारे तिची एक बहीण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
जान्हवी कपूरची बहीण म्हणजेच शनाया कपूर महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकद्वारे बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. गुंजन सक्सेना या भारतीय वायुदलातील पहिल्या महिला पायलट होत्या. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात शनाया कपूर अभिनय करणार नसून ती कॅमेऱ्याच्या मागे एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ती या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत असून तिचे वडील अभिनेता संजय कपूरनेच ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितली आहे.
संजयने सोशल मीडियावर नुकताच त्याच्या मुलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळला असून गॉगल देखील लावला आहे. या फोटोसोबत संजयने लिहिले आहे की, माझी मेहनती मुलगी सध्या ४१ डिग्री सेल्सियस तापमानात चित्रीकरण करत आहे. ती साहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिच्या करियरला सुरुवात करत असून फिल्म इंडस्ट्रीत मी तिचे स्वागत करत आहे.
महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये सुरू आहे. २४ मे पर्यंत चित्रपटाची संपूर्ण टीम लखनऊ मध्येच राहाणार आहे. कॅप्टन मनोज कुमार पांडे यूपी सैनिकी शाळा आणि एअरफोर्ससह इतर ठिकाणांवर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रीकरणानंतर पुढील चित्रीकरणासाठी या चित्रपटाची टीम बाहेरगावी रवाना होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत असून शरण शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. शरणची देखील चित्रपट दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटातील जान्हवीच्या लूकचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.