Sharad Kelkar : रुबाबदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज आणि उत्तम अभिनय असा सर्वांगीण कलाकार म्हणजे शरद केळकर. मराठीसह देशभरात आपल्या कामाची छाप उमटवणारा शरद केळकर कायम चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत त्याने चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो शेवटचा रामकुमार राव स्टारर 'श्रीकांत' चित्रपटात दिसला होता. पण, तुम्हाला माहितेय कोटींमध्ये मानधन घेणाऱ्या शरदने या चित्रपटासाठी फक्त 101 रुपये घेतले होते. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याने एवढं कमी मानधन घेण्याचं कारण सांगितलं.
न्यूज 18 इंडियाच्या 'डायमंड स्टेट्स समिट-महाराष्ट्र' या कार्यक्रमात शरद केळकरने 'श्रीकांत'मधील भूमिकेवर भाष्य केलं. तो म्हणाला, "जर मी चित्रपटांबद्दल बोललो, तर कोणत्याही कलाकाराच्या करिअरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखक कोण आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी जेव्हा कथा सांगितली तेव्हा मला ती खूप आवडली. ती एक सत्यकथा आहे. माझ्या पात्राचं नाव रवी मंथा असं आहे. ते खूप मनोरंजक आहे. मला कधीच वाटले नव्हते की कोणताही दिग्दर्शक मला अशी भूमिका देईल. विशेषत: जेव्हा आपल्या इंडस्ट्रीत तो एक उंच माणूस आहे, म्हणून त्याला खलनायक किंवा पोलिस बनवा असं स्टिरियोटाइप कास्टिंग असतं".
शरद केळकर आपल्या अभिनयाबद्दल म्हणाला, "मी थिएटर केलेले नाही. अभिनय शिकण्यासाठी मी कुठलीही वर्कशॉप केलेला नाही. पण जेव्हा माझ्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. तेव्हा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा कराव्यात, असे मला वाटतं राहिलं. जेणेकरून मी आयुष्यात काहीतरी नवीन शिकत राहिलं".
'श्रीकांत' चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनावर तो म्हणाला, "मी जितके मानधन घेतो तितके पैसे त्याच्याकडे नव्हते. म्हणून ते न घेणे चांगले असं मला वाटलं. दुसरं म्हणजे तुषार माझा जुना मित्र आहे. माझ्याकडे असते तर दिले असते असे तो प्रामाणिकपणे म्हणाला. त्यावर मग त्याला म्हटलं, मला काही देऊ नकोस, मी तुझ्यासाठी, मैत्रीसाठी आणि कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही भुमिका करतो". 'श्रीकांत' सिनेमात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री अलाया एफ यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा मे महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.