मराठमोळा शरद केळकर (Sharad Kelkar ) याला कोण ओळखत नाही? शरदने छोटा पडदा गाजवलाच पण बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. डिजिटल प्लॅटफॉर्मवरही त्याचा दबदबा आहेच. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता आणि बँक बॅलेन्स म्हणाल तर सगळा ठणठणाट होता. अशा परिस्थितीतून शरद बाहेर आला, इतकंच नाही तर त्याने इंडस्ट्रीत दबदबा निर्माण केला. मनिष पॉल याच्या ‘पोस्टकार्ड’ या कार्यक्रमात शरद केळकरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल, करीअर आणि स्ट्रगलबद्दल सांगितले. याचा एक प्रोमो मनिषने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
शरद म्हणाला...व्हिडीओत शरद केळकर त्याच्या स्ट्रगलविषयी बोलतो.‘ लोकांना आमचं काम दिसतं. याने चांगले काम केलं, याने वाईट काम केलं, असे लोक म्हणतात. पण यामागे अपार संघर्ष असतो. याबद्दल कोणी बोलत नाही. आमच्याकडे मर्सिडीज आहे. आम्ही चांगले कपडे घालतो, केस स्टाईलमध्ये ठेवतो, याचा अर्थ आम्हाला काहीच संघर्ष करावा लागला नाही, असं लोकांना वाटतं. यामागची बॅकस्टोरी त्यांना ठाऊक नसते. एक काळ असा होता, जेव्हा माझ्या खात्यात एक रूपयाही नव्हता. क्रेडिट कार्डचं कर्ज डोक्यावर चढलं होतं. त्याशिवायही अनेकांची उसनवारी द्यायची होती. के्रडिट कार्ड बंद झालं होतं आणि मला कर्जाची परतफेड करायची होती...,’ असे शरद या व्हिडीओत म्हणतोय.
शरदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अलीकडे तो ‘फॅमिली मॅन 2’मध्ये दिसला. लवकरच तो अजय देवगणच्या ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये दिसणार आहे. याशिवाय एनिमेशन सीरिज ‘द लीजेंड ऑफहनुमान 2’ मध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये रामायणातील हनुमानाची कथा दाखवली जाणार आहे.