मराठमोळा अभिनेता शरद केळकरने अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवली. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अभिनय करण्याबरोबरच शरद एक उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. अनेक साऊथ सिनेमांच्या हिंदी व्हर्जनसाठी त्याने आवाज दिला आहे. एस.एस.राजामौलींच्या 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर सिनेमालाही त्यानेच आवाज दिला होता. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं होतं. पण, 'बाहुबली'नंतर तशाच ऑफर येत असल्याचा खुलासा त्याने मुलाखतीत केला.
'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखत शरद केळकरने याचा खुलासा केला. तो म्हणाला, "बाहुबली सिनेमानंतर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी घडल्या. या सिनेमानंतर माझ्या आवाजामुळे अनेक सिनेमांच्या मेकर्सने मला ऑफर दिल्या होत्या. मी चांगलं व्हॉईस ओव्हर देऊ शकतो. याचा अर्थ मी त्याच पठडीतल्या भूमिका करायच्या असा होत नाही. मी आधी एक अभिनेता आहे. मी अभिनय करू शकतो. आणि माझ्या आवाजाला हवी तशी दिशाही देऊ शकतो. मी त्या सर्व ऑफर नाकारल्या. कारण, ते माझ्याकडे अभिनेता म्हणून येत नव्हते".
"मला नवीन भूमिका करायच्या होत्या. नवीन कामाच्या मी शोधात होतो. सुदैवाने गेल्या २ वर्षात अनेकांनी मला कास्ट करण्यासाठी इच्छा दाखवली. श्रीकांत सिनेमात तुम्हाला वेगळा शरद दिसेल. जूनमध्ये माझा एक सिनेमा येतोय. त्यातही मी वेगळी भूमिका साकारली आहे. मी नेहमीच वेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करत असतो. मी चांगली वेळ येण्याची वाट बघत आहे," असंही तो पुढे म्हणाला.
'बाहुबली' सिनेमाबाबत शरद म्हणाला, "बाहुबली १ आणि २ नंतर एक अभिनेता आणि माणूस म्हणून माझं आयुष्य बदललं. 'बाहुबली २'नंतर माझं जगच बदललं. आता छोट्या छोट्या गावातही लोक मला ओळखतात. मी मास्क जरी घातलं असेल तरी लोक आवाजावरुन मला ओळखतात. कोणत्याही कलाकारासाठी तुम्ही ओळख निर्माण होणं, ही मोठी गोष्ट आहे. याचं सगळं श्रेय मी राजामौली सरांना देईन. त्यांनी मला बाहुबलीचा आवाज बनण्याची संधी दिली. बाहुबलीचं डबिंग करताना राजामौली सर संध्याकाळी येऊन प्रत्येक डबिंग तपासून पाहायचे. पण, बाहुबली २च्या वेळी ते आले नाहीत. कारण, त्यांचा आमच्यावर विश्वास होता".