मुंबई - अभिनेता अजय देवगणचातानाजी चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजयने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अन् त्याचा एकत्रित फोटो फेसबुक अन् ट्विटरवरुन शेअर केला आहे. या फोटोसह अजयने दिलेलं कॅप्शन अतिशय महत्वपूर्ण आहे. ''क्रिकेट आणि चित्रपट... देशाला एकत्र आणणारे धर्म'' असे कॅप्शन अजयने दिले आहे. धोनीसोबतच्या भेटीचा अजय अन् धोनीलाही आनंद झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे.
एकीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण चा ‘छपाक’ सिनेमा उद्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर दुसरीकडे अजय देवगणचातानाजी हा चित्रपटही उद्याच प्रदर्शित होत आहे. दीपिका, ऐन चित्रपट रिलीजच्या तोंडावर जेएनयूमध्ये पोहोचली आणि सगळीकडे दीपिकाचीच चर्चा रंगली. जेएनयूत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेतली. तिच्यासोबत कन्हैय्या कुमार दिसल्याने अनेकांना ते रूचले नाही आणि अनेकांनी तिच्यावर टीका सुरू केली. तर तिच्या समर्थनार्थही तरुणाई पुढे सरसावली आहे. दुसरीकडे अजय देवगणने महेंद्रसिंह धोनीसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. अजयने हा फोटो शेअर करताच, त्याच्यावर कमेंटचा भरीमार सुरू झाला असून काही मिनिटांतच हजारोंच्या घरात लाईक्स झाले आहेत. अजय आणि धोनीला एकत्र पाहून सर्वांनाच आनंद झाला असून दोन लिजंड एकत्र आल्याचंही नेटीझन्सने कमेंटमध्ये म्हटलंय. तसेच, अनेकांनी तानाजी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अजयला शुभेच्छाही दिल्या आहेत. अजयने फेसबुक अन् ट्विटरवर फोटो शेअर करताना दिलेले कॅप्शनही अनेकांना भावले आहे. Cricket and Films ... the uniting religion of our country असे कॅप्शन अजयने दिले आहे. एकीकडे बॉलिवूडमधील दिग्गज तर दुसरीकडे क्रिकेटमधील दिग्गज असा हा फोटो असल्याने टू लिजंड इन वन फ्रेम अशाही कमेंट अनेकांनी दिल्या आहेत.