आजघडीला बिकिनी फोटोशूट सर्वसामान्य बाब आहे. पण 60 च्या दशकात असे बिकिनीत फोटोशूट वा चित्रपटात बिकिनी सीन देण्यासाठी हिंमत हवी होती. बड्या बड्या अभिनेत्रीही असा सीन द्यायला तयार नसायच्या. त्या काळात शर्मिला टागोर बिकिनी फोटोशूट करणा-या व बिकिनी सीन देणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या. 1966 साली त्यांचे बिकिनीतील फोटो फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकले होते. भारतीय प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का होता. कारण त्यांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीत पोज देताना बघितले होते. साहजिकच देशात खळबळ माजली होती. अगदी संसदेतही यावरून रणक्रंदन झाले होते.हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, शर्मिलांची ताजी मुलाखत. होय, एका ताज्या मुलाखतीत शर्मिला या बिकिनी फोटोशूटच्या अनुभवावर बोलल्या.
मला लोक विसरू देत नाहीत...माझ्या आयुष्यातील अनेक निर्णय प्रवाहाविरूद्ध घेतलेले होते. 1966 साली केलेले बिकिनी फोटोशूटही असेच होते. लोक मला ही गोष्ट कधीच विसरू देत नाही. या फोटोशूटवर बरीच चर्चा झाली. पण खरे सांगू हे फोटोशूट करताना माझ्या मनात तिळभरही लाज वा संकोच नव्हता, असे त्या म्हणाल्या.
मी ते का केले होते?तेव्हा आपला समाज किती रूढीवादी होता. त्याकाळात मी ते फोटोशूट केले. पण मी ते का करतेय, याचा मला काहीही अंदाज नव्हता. माझ्या लग्नाच्या काही दिवस आधी मी ते फोटोशूट केले होते. मला आठवते, जेव्हा मी फोटोग्राफरला 2 पीस बिकिनी दाखवली होती, तेव्हा तोही विचारात पडला होता. तुला नक्की ही घालायचीय? असे त्याने मला विचारले होते. काही शॉट्समध्ये तर त्याने स्वत: मला बॉडी कव्हर करण्यास सांगितले होते. माझ्यापेक्षा जास्त फोटोग्राफरला टेन्शन आले होते. मी मात्र अगदी कम्फर्टेबल होते, असे त्यांनी सांगितले.
अन् मला धक्का बसला...हे फोटो प्रसिद्ध झाले आणि माझ्यावर प्रचंड टीका होऊ लागली. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी चांगली दिसत होते, मग लोकांना हे फोटो का आवडले नाहीत? असा प्रश्न मला पडला होता. काही लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले, त्याचे मात्र मला खूप दु:ख झाले होते. मी ते फोटोशूट केले कारण मी स्वत:ला प्रेझेंट करू इच्छित होते. मी तरूण होते आणि नवी आव्हाने स्वीकारण्यास उत्सूक होते, असेही त्यांनी सांगितले.