संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी : द डायमंड बाजार' (Heeramandi: The Diamond Bazaar) ही वेबसीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. या सीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केलं आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मिन सेगल, आदिती राव हैदरी आणि संजिदा शेख या अभिनेत्री झळकल्या आहेत. त्यामुळे त्या चर्चेत आहेत. परंतु, या सगळ्यात शर्मिन (Sharmin Segal) सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
'हिरामंडी'मध्ये शर्मिनने आलमजेब ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. शर्मिनने तिच्या भूमिकेला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीदेखील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. शर्मिनला अभिनय जमला नसून अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. परिणामी, तिने या ट्रोलिंगला कंटाळून एक निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले नेटकरी?
'हिने साकारलेली आलमची भूमिका मला जराही आवडली नाही. जराही तिच्या चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्स नव्हते. सगळीकडे सेमच एक्स्प्रेशन्स..का?', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'फक्त मीच असा आहे का ज्याने तिचे सीन स्किप केले आहेत. कारण, तिचे सीन खूपच बोरिंग होते', 'तिच्याऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री नक्कीच हा रोल छान करु शकली असती', 'आलमजेब खूप सुंदर कॅरेक्टर आहे. मात्र, संजय लीला भन्साळीने लाकडी ठोकळ्याचे एक्स्प्रेशन्स असलेल्या भाचीला यात कास्ट केलं', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला कमालीचं ट्रोल केलं आहे.
ट्रोलिंगला कंटाळली शर्मिन
शर्मिनच्या पोस्टवर निगेटिव्ह कमेंट पाहून अभिनेत्रीने तिचं कमेंट सेक्शन बंद केलं. संजय लीला भन्साळी यांनी नेपोटिझम केल्याचंही नेटकऱ्यांनी या ट्रोलिंगमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच तिने कमेंट सेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. शर्मिन यापूर्वी भन्साळी प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेल्या मलाल या सिनेमातही झळकली होती. हा तिचा डेब्यू मुव्ही होता ज्यात तिच्यासोबत मीजान जाफरीने स्क्रीन शेअर केली होती.