विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नाआधी विकी व कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आता विकीचा लहान भाऊ सनी कौशलच्या (Sunny Kaushal)अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. होय, सनी कौशल मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ ( Sharvari Wagh) हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकी व कतरिनाच्या लग्नाला शर्वरी सुद्धा हजर होती. या लग्नातील तिचा वावर पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
शर्वरी वाघ व सनी कौशल या दोघांनी ‘द फरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. खरं तर यानंतरच त्यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण विकी-कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या काही मोजक्या खास पाहुण्यांमध्ये शर्वरीचाही समावेश असलेला पाहून या चर्चांना आणखीच जोर चढला होता. अलीकडे शर्वरी ‘शिद्दत’ या सनीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. सनीसोबत तिनं मस्तपैकी पोझ दिल्या आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चेला आणखीच बळ मिळालं होतं. आता शर्वरीने या डेटींगच्या बातम्यांवर मौन सोडलं आहे.
‘इंडिया डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत शर्वरी यावर बोलली. ‘मी आणि सनीने द फरगॉटन आर्मी मध्ये एकत्र काम केलंय, त्याला आता चार वर्ष झालीत. चार वर्षांपूर्वी आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. आजही आमची मैत्री कायम आहे. गेल्या चार वर्षांत आमची मैत्री आणखी घट्ट झालीये. यापेक्षा माझ्यात आणि सनीत काहीही नाही. त्या अफवा होत्या आणि आहेत. जेव्हा तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र असता, तेव्हा ती मैत्री तुम्ही लपवू शकत नाही. आमच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी आमच्या मैत्रीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आपण जगणं तर सोडू शकत नाही ना? इंडस्ट्रीमध्ये माझे काही सच्चे मित्र आहेत, ज्यांच्यासाठी मी नेहमीच उभी असेन,’ असं ती म्हणाली.
शर्वरी वाघने नुकताच ‘बंटी और बबली 2’मधून दमदार बॉलिवूड डेब्यू केला. तिची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास, ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि आई आर्किटेक्ट आहे. शर्वरीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली.