टू शशीजी, फ्रॉम बबुआ...! अमिताभ बच्चन यांची शशी कपूर यांना आगळी-वेगळी श्रद्धांजली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 5:18 AM
शशी कपूर यांचे सोमवारी मुंबईच्या एका रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच महानायक अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक बच्चन ...
शशी कपूर यांचे सोमवारी मुंबईच्या एका रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच महानायक अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. अमिताभ यांनी शशी कपूर यांच्यासोबत ‘दीवार’,‘सुहाग’,‘त्रिशूल’ अशा चित्रपटात एकत्र काम केले आहे. शशी कपूर यांच्या निधनाने शोकमग्न अमिताभ यांनी ब्लॉग लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अनेक स्मृतींना अमिताभ यांनी उजाळा दिला. ‘हम जिंदगी को अपनी कहां तक सम्भालते. इस कीमती किताब का कागज खराब था....’, या रूमी जाफरी यांच्या काव्यपंक्तींनी अमिताभ यांनी आपल्या या ब्लॉगची सुरूवात केली आहे. ‘टू शशीजी, फ्रॉम बबुआ...’ (शशी कपूर अमिताभ यांना बबुआ या नावाने बोलवायचे.)असे लिहितं,अमिताभ यांनी आपला हा ब्लॉक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. READ : अमिताभ यांनी लिहिलेला हा ब्लॉग तुम्ही या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.६० च्या दशकात अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होते. या काळात त्यांनी एका मॅगझिनमध्ये शशी कपूर यांना पहिल्यांदा बघितले. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये हा किस्सा लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मॅगझिनमध्ये शशी कपूर यांचा शानदार फोटो होता आणि सोबत कॅप्शन. राज आणि शम्मी कपूर यांचा लहान भाऊ लवकरच डेब्यू करतो आहे...असे ते कॅप्शन होते. हे कॅप्शन वाचून मी काहीसा नाराज झालो होतो. आजूबाजूला असे लोक असतील तर माझा काहीही चान्स नाही, असे त्यावेळी माझ्या मनात आले होते.’ शशी कपूर यांच्या जाण्याने माझ्या आणि त्यांच्या आयुष्यातील बरेच महत्वाचे आणि कधीही इतरांसमोर न आलेले किस्सेही निघून गेले, असे म्हणत बिग बींनी आपल्या ब्लॉगचा शेवट केला आहे. मी रूग्णालयातच शशीजींना शेवटचा भेटलो होतो. पण त्यानंतर मी त्यांची भेट घेणे टाळले. कारण माझ्या जवळच्या मित्राला रूग्णालयात त्या अवस्थेत पाहायला माझे मन धजावत नव्हते, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे.अमिताभ आणि शशी कपूर यांची जोडी तुफान गाजली होती. १९७५ मध्ये आलेल्या ‘दीवार’मध्ये या जोडीने दोन भावांची भूमिका साकारली होती. यातील शशी कपूर यांच्या तोंडचा ‘मेरे पास माँ है...’ हा एक संवाद आजही लोकांच्या तोंडी आहे.