Join us

"तू मूर्ख मुलगी आहेस!", इंटिमेट सीन करण्याआधी शशी कपूर शबाना आझमींना का ओरडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 5:29 PM

फकिरा सिनेमावेळी शशी कपूर यांच्यासोबत शबाना आझमींना इंटिमेट सीन करायचे होते. पण त्याआधी त्यांना ओरडा का खावा लागला? (shashi kapoor, shabana azmi)

बॉलिवूडच्या झगमगत्या इंडस्ट्रीकडे नजर गेली तर प्रत्येक सिनेमाविषयीचे एकापेक्षा एक किस्से सापडतील. असाच एक किस्सा शबाना आझमींच्या बाबतीत घडलेला. जेव्हा इंटिमेट सीन करण्याआधी शबाना आझमींना ओरडा खावा लागला. झालं असं की, शबाना आझमी या शशी कपूर यांच्या लहानपणापासूनच्या फॅन. शशी यांचे फोटोग्राफ जमा करुन त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी शबाना बालपणी जीवाचं रान करत. पुढे अभिनेत्री झाल्यावर शशी कपूर यांच्यासोबत शबाना आझमींना सिनेमा करण्याची संधी मिळाली. सिनेमाचं नाव 'फकिरा'. 

.. शबाना आझमींना रडू कोसळलं

शबाना आझमी 'फकिरा' सिनेमाच्या सेटवर शूटींगसाठी आल्या.  या सिनेमातील 'दिल में तुझे बिठाकर' गाण्याचं शूटींग करायचं होतं. शशी कपूर यांना यायला अजून अवकाश होता. तोवर शबाना यांनी सीन समजून घेतला. तेव्हा त्यांना कळलं की या गाण्यासाठी थोडं इंटिमेट व्हावं लागेल. काही इंटिमेट दृश्यांचं शूटींग त्यांना शशी यांच्यासोबत करावं लागणार होतं. त्यामुळे शूटींग सुरु होण्याआधीच त्यांनी सेट सोडला. आणि रुममध्ये जाऊन रडायला लागल्या.

शशी कपूर शबाना आझमींवर बरसले...

शशी कपूर सेटवर येताच त्यांना सर्व घटना समजली. रागाच्या भरात त्यांनी शबाना आझमींचा दरवाजा ठोठावला. शबाना यांनी दरवाजा उघडला. तो उघडताच शशी कपूर रागात म्हणाले, "तु जेव्हा मम्मी मम्मी करत तुझ्या आईला सांगितलंस  की तुला सिनेमात यायचं आहे. तेव्हा तुला असं काही शूटींग करावी लागेल याची कल्पना नव्हती का? मुर्ख मुलगी!" शशी कपूर यांचा लालबुंद चेहरा पाहून शबाना आझमींना सुचेनासंच झालं. त्यांना शशी यांचं वागणं आवडलं नव्हतं. पुढे अर्ध्या तासानंतर जेव्हा त्या सेटवर आल्या तेव्हा जणू काही काही झालंच नाही अशा आवेशात शशी यांनी शबाना यांचं स्वागत केलं. अशाप्रकारे शबाना प्रेमाने शशी कपूर यांना 'वेडा माणूस' म्हणतात.

टॅग्स :शबाना आझमीशशी कपूर