अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal) रजिस्टर मॅरेज केलं. आंतरधर्मीय विवाह केल्याने सोनाक्षीवर बरीच टीकाही झाली. शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) स्वत: सुरुवातीला या लग्नाविरोधात होते. मात्र नंतर त्यांनी शेवटी होकार दिला. तरी सोनाक्षीच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ लव-कुश नाराज होते हे स्पष्ट दिसलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत ते मान्यही केलं. तर आता सोनाक्षीने वडील शत्रुघ्न सिन्हा आणि नवरा जहीर इकबालसाठी एकत्र बर्थडे पार्टी आयोजित केली होती. दोघांच्या वाढदिवसामध्ये एकाच दिवसाचं अंतर आहे. या बर्थडे पार्टीत सोनाक्षीचे दोन्ही भाऊ मात्र दिसले नाहीत.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. आता कर त्यांचं युट्यूब चॅनलही आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा ९ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो तर जहीर इकबालचा १० डिसेंबर रोजी असतो. सोनाक्षीने दोघांसाठी एकत्रच बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. अभिनेत्री रेखाही या पार्टीत हजर होत्या. त्यांनी शत्रुघ्न सिन्हांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सोनाक्षीने युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचे जवळचे मित्र नातेवाईक दिसत आहेत. आनंदाचा माहोल यामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यात सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लव आणि कुश कुठेच दिसत नाहीत. यामुळे त्यांची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली आहे.
याआधी शत्रुघ्न सिन्हा 'लेहरे'ला दिलेल्या मुलाखतीत लव-कुशच्या नाराजीवर म्हणाले होते की, "मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही. तेही माणसंच आहेत. कदाचित त्यांच्यात अजून तेवढा समजूतदारपणा आला नसेल. मी त्यांचं दु:ख आणि गोंधळ समजू शकतो. संस्कृतीबाबत प्रत्येकाचाच विशिष्ट विचार असतो. मी जर त्यांच्या वयाचा असतो तर कदाचित मीही असाच वागलो असतो. पण मला इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यातून आलेला समजूतदारपणा आहे. म्हणून मी माझ्या मुलांएवढा नाराज झालो नाही."