बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विक्रांतने काही दिवसांपूर्वीच अभिनयातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. 12th Fail फेम अभिनेत्याच्या या पोस्टची प्रचंड चर्चा रंगली होती. पण, नंतर यूटर्न घेत संन्यास नव्हे तर काही वेळ ब्रेक घेणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. विक्रांत मेस्सीच्या या ब्रेकबाबत आता सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विक्रांत मेस्सीच्या ब्रेकबाबत भाष्य केलं. यावेळी विक्रांत मेस्सीची तुलना त्यांनी त्यांच्या पिढीतील कलाकारांशी केली. त्यांच्या करिअरच्या महत्त्वाच्या काळाबद्दल आणि स्ट्रगलबद्दलही त्यांनी सांगितलं. कधी ब्रेक घ्यायचा विचारच केला नसल्याचंही ते म्हणाले. "दिवसभर आम्ही तीन शिफ्टमध्ये काम केलेलं आहे. आम्ही न थांबता शूटिंग करायचो. एका स्टुडियोतून दुसऱ्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी धावत असायचो. मी कधी कधी विसरून जायचो की नक्की कोणत्या सिनेमासाठी शूटिंग करत आहे", असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
पुढे त्यांनी विक्रांतच्या निर्णयाबद्दल बोलताना त्याचं कौतुकही केलं. ते म्हणाले, "आज कालची मुलं जास्त समजुतदार आहेत. त्यांना माहीत आहे की आपण कधी कुठे थांबलं पाहिजे आणि कधी पुन्हा नव्याने सुरुवात केली पाहिजे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना नाही. आम्हाला वाटायचं की आपण दिसलो नाही तर लोकांच्या मनातूनही गायब होऊन जाऊ".
विक्रांतने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
"जसजसा मी पुढे सरकतोय तसतसे मला वाटते की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या २०२५ मध्ये आम्ही एकमेकांना शेवटची भेट घेणार आहोत. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही." यावरुन विक्रांत अभिनयातून कायमची निवृत्ती घेणार अशा चर्चा रंगल्या. आता विक्रांतने तो निवृत्त होत नाही तर ब्रेक घेतोय असं सांगितलं असल्याने, या चर्चांवर पूर्णविराम पडलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
रिटायरमेंटवर दिलेलं स्पष्टीकरण
"मी रिटायर होत नाहीये. मी थोडा थकलोय त्यामुळे मला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. माझी तब्येतही ठीक नाहीये. लोकांनी चुकीचं वाचलंय." असं उत्तर विक्रांतने दिलंय.