आपल्या भारदस्त आवाजात 'खामोश' असं म्हणत सर्वांनाच शांत करणारे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) ७० च्या दशकात आघाडीवर होते. त्यांनी 'दोस्ताना', 'लोहा', 'काला पत्थर', 'नसीब' असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र यश इतक्या सहजासहजी मिळत नाही हेच खरं. शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठे कष्ट करुन हे यश मिळवलं. अनेकदा त्यांनी आर्थिक संकटाला सामोरं जाताना काटकसर केली. वडिलांच्या स्ट्रगलविषयी मुलगा लव्ह सिन्हाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत लव्ह सिन्हा म्हणाला, 'अनेकदा वडिलांकडे पैसे नसायचे. ते एक तर ट्रॅव्हलवर खर्च करु शकत होते किंवा पोट भरु शकत होते. अनेकदा काहीतरी खाऊन ते कित्येक मैल पायी चालत जायचे. बसचे तिकीट काढले तर त्यांच्याजवळ खाण्यासाठी पैसे नसायचे.' हे सांगताना लव्ह सिन्हा भावूक झाला.
तो पुढे म्हणाला, 'माझे वडील पटनाचे आहेत. त्यांनी खूप कमी वयात घर सोडलं आणि ते मुंबईला आले. सिनेमांमध्ये करिअरला सुरुवात केली. ते चांगले अभिनेते बनतील की नाही असं त्यांना वाटायचं. त्यांना काहीही करुन सुपरस्टार व्हायचं होतं. कारण अपयश स्वीकारुन घरी जाण्याचा त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. जेव्हा ते यशाच्या शिखरावर होते तेव्हा त्यांनी स्वत:चं घर घेतलं. छोटं होतं पण आपलं होतं. घरात नेहमीच लोकांची गर्दी असायची. मग एक अशी वेळ आली जेव्हा त्यांचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले. तेव्हा मात्र कोणीच घरी यायचं नाही. मी त्यांचं यश आणि अपयश दोन्ही जवळून पाहिलं.'
लव्ह सिन्हाने 2010 मध्ये 'सदियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो 'पलटण' या सिनेमात दिसला. आगामी 'गदर 2' मध्ये लव्ह सिन्हाचीही भूमिका आहे.