Join us

अक्षय कुमारची बनली नायिका, ऐश्वर्यासोबतही केलं काम, मग सिनेइंडस्ट्रीतून घेतला संन्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:40 IST

मॉडेलिंगच्या दुनियेत एकेकाळी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या अभिनेत्रीने ग्लॅमर जग सोडून निवृत्तीचा मार्ग पत्करला.

ग्लॅमरचे जग अनेकांना आकर्षित करत असते. लोकांना आपले सामान्य जीवन सोडून झगमगत्या ग्लॅमरमध्ये हरवून जावेसे वाटते. यासाठी ते कठोर परिश्रम करण्यासाठीही तयार असतात. पण असेही काही लोक आहेत जे ग्लॅमरचे रस्ते पाहून त्यापासून दूर जातात आणि धर्माचा मार्ग स्वीकारतात. झायरा वसीम आणि सना खान ही याची उत्तम उदाहरणे आहेत. या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. जी एकेकाळी मॉडेलिंगच्या दुनियेत सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्याशी स्पर्धा करताना दिसली होती. मग असं काही घडलं की तिने ग्लॅमर जग सोडून संन्यास घेतला. आता तिला धर्माच्या जगात गेशे नामग्याल यांगचेन या नावाने ओळखले जाते.

ही अभिनेत्री म्हणजे बरखा मदान (Barkha Madan). बरखा मदानने १९९४ मध्ये मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. याच वर्षात सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय देखील या स्पर्धेत एकमेकांना जोरदार स्पर्धा देत होत्या. या सौंदर्य स्पर्धेत बरखा मदन तिसरी उपविजेती ठरली. जिला मिस टुरिझम इंटरनॅशनल पिजेंटचा किताब मिळाला. यानंतर १९९६ मध्ये बरखा मदानने खिलाडी का खिलाडी या चित्रपटात अक्षय कुमार सारख्या हिरोसोबत काम केले. मात्र, बरखा मदानला आपला ठसा उमटवण्यासाठी सात वर्षे वाट पाहावी लागली. तिला राम गोपाल वर्माच्या भूत चित्रपटात मनजीत खोसलाच्या भूताची भूमिका करण्याची संधी मिळाली.

अभिनयाला रामराम करण्याचा घेतला निर्णय२०१० मध्ये बरखा मदानने निर्माती बनण्याचा निर्णय घेतला आणि एक नवीन कंपनी देखील स्थापन केली. तिने तिच्या बॅनरखाली सोच लो आणि सुर्खाब या दोन चित्रपटांची निर्मिती केली. बरखा मदान सुरुवातीपासूनच दलाई लामा यांची अनुयायी होती. २०१२ मध्ये तिने स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन केले आणि बुद्धीचा मार्ग अनुसरून संन्यास घेतला. आता ती एका ठिकाणी स्थायिक नसते. ती कुठेही असली तरी ती अनेकदा इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.