मुंबई - महापालिकेने बेकायदेशीररित्या बंगल्यावर कारवाई केल्याचा आरोप करत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने पालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. त्यासाठी तिने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे, कंगना आणि शिवसेना वाद अद्यापही संपुष्टात आलेला दिसत नाही. मात्र, कंगनाच्या या भूमिकेवरुन अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने कंगनाच्या सुरक्षेवरुन अनेक सवाल केले आहेत. तसेच, कंगनाला जनतेच्या पैशातून सुरक्षा दिलीय, असेही तिने सांगितले.
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर मुंबई पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यांनतर लगेचच कंगणाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कारवाईवर स्थगिती देत कंगना रनौतला याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. पालिकेने हेतुपूर्वक कारवाई केल्याचे निरीक्षण न्यायालयाने स्थगिती देताना नोंदविले होते.
कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर अशी केली होती. त्यानंतर, कंगनावर राज्यातील सर्वच स्तरातून टीका झाली. शिवसेनेनं कंगनाला, हा महाराष्ट्राचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचं म्हटलं. त्यानंतर, कंगना व शिवसेना वाद चांगलाच रंगला. यावरुन, मुंबईत न येण्याची धमकीही कंगनाला देण्यात आली. त्यामुळे कंगनाला केंद्र सरकारकडून वाय प्लस पुरविण्यात आली आहे. कंगनाच्या या वाय प्लस सुरक्षेवर मराठीमोळ्या उर्मिला मांतोडकरने प्रश्न उपस्थित केले आहेत.
कंगनावर चर्चा करावी, तिच्याविषयी बोलावे, असे मला वाटत नाही, असे उर्मिलाने म्हटले. तसेच, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देतं. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. तिने क्लेम केला होता की, माझ्याकडे माफियांची नावे असून ती मला नार्को टेस्ट डिपार्टमेंटकडे द्यायची आहेत, असे म्हणून तिने सुरक्षा मागितली. मात्र, दिला हे नावं द्यायची होती तर, तिने मेलवरुन, टेक्नॉलॉजी वापरुन ती द्यायला हवी होती. त्यासाठी, येथे येण्याची काय गरज? ती चिथवण्यासाठीच मुंबईत आली होती, असे उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे तीने नावं दिली का? त्यातून काय झालं का? असा सवालही उर्मिला यांनी विचारला आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्या इंडस्ट्रीला तुम्ही बदनाम करताय, ही घाण आहे, असे म्हणत उर्मिला यांनी कंगनावर सडेतोड मते मांडली.
जया बच्चन व कंगना वाद
अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही ड्रग्जच्या आरोपावरुन कंगनाला खडे बोल सुनावले. जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून सोनम कपूर त्यांच्या समर्थनात समोर आली. जया बच्चन नुकत्याच राज्यसभेत म्हणाल्या होत्या की, जे लोक बॉलिवूडमध्ये नाव कमवतात, तेच लोक पुढे जाऊन बॉलिवूडच्या प्रतिमेला धुळीस मिळवतात. त्यांनी नाव न घेता अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता रवि किशन यांना टोमणा मारला होता. रवि किशन सभागृहात म्हणाला होता की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचं सेवन होतं. फिल्ममेकर अनुभव सिन्हा याने जया बच्चन यांची प्रशंसा केली आहे आणि त्यांच्या व्हिडीओची क्लिप शेअर करत लिहिले की, 'जयाजी यांना सादर प्रणाम करतो. ज्यांना माहीत नाही, त्यांनी हे बघा. पाठिचा कणा असतो दिसतो'.