Join us

'लोक काय म्हणतील? हा विचार..' पहिल्या घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगवर शेफालीने दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:56 IST

Shefali jariwala: पराग त्यागीसोबत शेफालीने दुसरा संसार थाटला आहे. मात्र, पहिलं लग्न मोडल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर आता ती व्यक्त झाली आहे.

2002 मध्ये 'कांटा लगा' या गाण्याने इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळे अभिनेत्री शेफाली जरीवाला ( Shefali jariwala) रातोरात सुपरस्टार झाली. या गाण्यानंतर तिचा बॉलिवूडमधला प्रवास सुरु झाला. परंतु, तिच्या फिल्मी करिअरपेक्षा नेटकऱ्यांमध्ये तिचं खासगी जीवन जास्त चर्चेत राहिली. यातही तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. यामध्येच अलिकडेच शेफालीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या पहिल्या लग्नाविषय़ी आणि घटस्फोटाविषयी भाष्य केलं आहे.

शेफालीने 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमधये तिने तिच्या घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच ट्रोलिंगविषयी सुद्धा तिचं मत मांडलं. शेफालीने मीट ब्रदर्सच्या हरमीत सिंह याच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर तिने अभिनेता पराग त्यागी सोबत संसार थाटला. यात तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

"माझं कुटुंब म्हणजे माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. खासकरुन माझे वडील. त्यांनी मला एक मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणूनच लहानाचं मोठं केलं. माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळेच आज मी खंबीरपणे उभी आहे. चांगलं-वाईट यांची समज आहे. माझ्या कुटुंबियांनी माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे मग मी कोणाची पर्वा करत नाही. जर तुमची सपोर्ट सिस्टीम स्ट्राँग असेल तर आयुष्यात कितीही वादळं येऊ देत तुम्ही ते उलटवून लावता. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. माझ्याही आला. पण, माझ्या कुटुंबामुळे मी त्यातून बाहेर पडू शकले. खरं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसिकरित्या स्ट्राँग होणं गरजेचं आहे. संयम ठेवणं गरजेचं असतं नाही तर मोडून पडायला वेळ लागत नाही", असं शेफाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आपला समाज फार जजमेंटल आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष. जर लोक काय म्हणतील हा विचार मी करत बसले तर ते काय करतील? मी कोणाची पर्वा करत नाही. मला आणि माझ्या मनाला जे योग्य वाटेल मी तेच करते. ज्या गोष्टींमध्ये माझे कुटुंबीय मला पाठिंबा देतात ती गोष्ट करायला मला कधीच भीती वाटत नाही. तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांसोबतच तुमचा तिरस्कार करणारेही असतात. मी फक्त माझ्यावर प्रेम करण्यांचा विचार करते. त्यामुळे ट्रोलर्स आणि हेटर्स यांचा माझ्यावर काडीमात्र परिणाम होत नाही. मी माझ्या लहानशा जगात फार खूश आहे. मी स्वत: ला फार नशीबवान समजते. माझे फॉलोअर्स मला हिंमत देतात आणि तेच माझं एक प्रकारचं इंधन आहे." 

टॅग्स :शेफाली जरीवालाबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन