Join us

शहनाज गिलचे वडील अडकणार कायद्याच्या कचाट्यात?; पोलीस सुरक्षेचा केला गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:29 PM

shehnaaz gill: पंजाब पोलिसांनी संतोख सिंह सुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. क्यूट स्वभाव आणि सौंदर्य यांच्या जोरावर चर्चेत येणारी शहनाज यावेळी तिच्या वडिलांमुळे चर्चेत येत आहे. अभिनेत्रीचे वडील संतोख सिंह सुख (Santokh Singh Sukh) हे सध्या पंजाब पोलिसांच्या रडारवर आहेत. इतकंच नाही तर पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर आरोपदेखील केले आहेत.

संतोख सिंह सुख यांनी पोलीस सुरक्षेचा गैरवापर केल्याचा आरोप पंजाब पोलिसांनी केला आहे. मात्र, संतोख सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच पोलिसांनीच मानसिक त्रास दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शहनाजचे वडील चर्चेत येत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? 

काही दिवसांपूर्वी संतोख सिंह यांना एका पाकिस्तानी नंबरवरुन फोन आला होता. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. इतकंच नाही तर हे पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडून सुरक्षा मिळावी अशी मागणी केली होती. परंतु, त्यांनी या सुरक्षेचा गैरवापर केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

काय म्हणाले पोलीस?

बाबा बकालाचे पोलीस उपअधिक्षक सुरिंदर पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संस्था चालविण्यासाठी त्यांनी संतोख सिंह यांना सुरक्षा दिली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा दुरुपयोग केला.

काय आहे संतोख सिंह यांचं म्हणणं?

पोलिसांनी स्टेटमेंट जाहीर केल्यानंतर शहनाजच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी आपल्यावर खोटे आरोप लावले असून मला मानसिक त्रास झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस त्यांची चूक लपवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडशेहनाझ गिलपंजाबसेलिब्रिटी