Join us  

Shehzada : 'पठाण'ची क्रेझ पाहता घाबरला 'शहजादा', कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:35 PM

'पठाण'चे यश बघता रांगेत असलेले इतर चित्रपट मात्र आता सावध पावलं टाकताना दिसत आहेत.

Shehzada Release Date Postponed : बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आला आणि त्याने धुमाकूळच घातला. शाहरुखची क्रेझ आणि 'पठाण'चे यश बघता रांगेत असलेले इतर चित्रपट मात्र आता सावध पावलं टाकताना दिसत आहेत. त्यातच आता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) शहजादा ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कार्तिकचा 'शहजादा' आता एक आठवडा पुढे गेला आहे.

१७ फेब्रुवारीला रिलीज होणार 'शहजादा'

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'पठाण'ची क्रेझ पाहता 'शहजादा'च्या मेकर्सने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रोहित धवन दिग्दर्शित शहजादा १० फेब्रुवारी रोजी रिलीज होणार होता. मात्र आता सिनेमाची रिलीज डेट ७ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. आता शहजादा १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

पठाणची छप्परफाड कमाई

२५ जानेवारी रोजी पठाण (Pathaan) रिलीज झाला आणि बॉक्सऑफिसवर कलेक्शनचा पाऊसच सुरु झाला. शाहरुखची जादू अजूनही कायम असल्याचंच यातून स्पष्ट झालं. पठाणची यशस्वी कामगिरी बरेच दिवस चालू राहील असं चित्र दिसतंय. त्यामुळे पुढे प्रदर्शनाच्या रांगेत असणाऱ्या सिनेमांना धडकीच भरली आहे. अशा परिस्थितीत शहजादाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.  पठाण लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे तर वर्ल्डवाईड पठाणने सहा दिवसात ६०० कोटींची कमाई केली आहे.

कार्तिक आर्यनचा 'शहजादा' अल्लू अर्जुनचा तेलुगू चित्रपट 'अलावैकुंठपुरमुलु'चा रिमेक आहे. शहजादा मध्ये कार्तिक आर्यनसह 'क्रिती सेनन', 'मनिषा कोईराला', 'परेश रावल', 'रोनित रॉय' यांचीही भूमिका आहे. 'लुकाछुपी' सिनेमानंतर कार्तिक आणि क्रितीची जोडी पुन्हा पडद्यावर बघायला मिळणार आहे. मात्र त्यासाठी चाहत्यांना आणखी वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाबॉलिवूडकार्तिक आर्यनशाहरुख खान