अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला महिना होऊन गेला. मात्र अद्यापही सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळावे यासाठी सुशांतचे चाहते या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. अभिनेता शेखर सुमन हेही त्यापैकीच एक़ सुशांतला न्याय मिळावा म्हणून शेखर सुमन यांनी मोहित सुरु केली होती. मात्र आता अचानक एका पाठोपाठ एक असे 5 ट्वीट करत त्यांनी या प्रकरणापासून स्वत:ला दूर करत असल्याचे सांगितले. यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी शेखर सुमन यांनी लावून धरली होती. यासाठी त्यांनी एक पत्रकारपरिषदही घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र अचानक त्यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शेखर सुमन यांनी सलग 5 ट्वीट केलेत.
पहिल्या ट्वीटमध्ये शेखर सुमन म्हणाले,
आत्तापर्यंत मला बळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार. पण आता मला मागे हटण्याची परवानगी द्या. कारण सुशांतच्या कुटुंबाने या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगले आहे. यामुळे मला त्रास होतोय. माझ्या मते, या प्रकरणी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विशेषाधिकार आहे आणि आपल्या सर्वांना त्याचा आदर करायला हवा, असे शेखर सुमन यांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले.
दुस-या ट्वीटमध्ये लिहिले,
मात्र मी सायलेन्ट फोर्स म्हणून तुमच्या पाठीशी आहे. सुशांतला न्याय मिळेल तेव्हा मला सर्वाधिक आनंद होईल. सर्वांचे आभार, असे लिहित शेखर यांनी सुबह्मण्यम स्वामी यांचेही आभार मानले आहेत.
तिस-या ट्वीटमध्ये म्हटले..
मला नाही माहित की आपल्या प्रयत्नांचे काय फळ मिळेल. मात्र आपण सर्व जगाला आपली शक्ती, एकता दाखवू शकतो. व्यवस्थेला हादरवून सोडू शकतो. याप्रकरणावर लक्ष देण्यासाठी बाध्य करू शकतो, असे शेखर सुमन यांनी तिस-या ट्वीटमध्ये लिहिले.
या तीन ट्वीटनंतर लोकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर त्यांनी आणखी एक ट्वीट केले, ‘मी स्पष्ट करू इच्छितो की, मला कोणीही धमकी दिलेली नाही. मी बॅकआऊट करत नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ मी फक्त बॅक सीट घेतोय. दोघांमध्ये बराच फरक आहे. मी सोबत आहे पण कुटुंबाने समोर यायला हवे, काही बोलायला हवे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
पाचव्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, मी याबद्दल दुस-यांचा विचार केला. लोकांना मी निराश करू शकत नाही, असे मला वाटतेय. मी फ्रंटवर लढणार. त्यांचे कुटुंब समोर येत नसेल तर काय झाले? सुशांत पब्लिक फिगर होता आणि आपण त्यांच्यासाठी लढू.