छोट्या पडद्यापासून मोठा पडदा गाजवणा-या शेखर सुमन यांचा ‘उत्सव’ हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे. होय, ‘उत्सव’ हा शेखर सुमन यांचा पहिला सिनेमा होता आणि या सिनेमात त्यांची हिरोईन होती सदाबहार रेखा. 37 वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा तेव्हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. ते म्हणजे, यातील बोल्ड सीन्स. शेखर यांनी या सिनेमात रेखासोबत अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. आता इतक्या वर्षानंतर ‘उत्सव’मागची कथा शेखर सुमन यांनी सांगितली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन यांनी हा सिनेमा त्यांना कसा मिळाला होता, याचा रंजक किस्सा ऐकवला.ते म्हणाले, ‘उत्सव’ हा माझा पहिला सिनेमा होता आणि शशी कपूर हे माझ्या या पहिल्या सिनेमाचे निर्माते होते. या चित्रपटासाठी अनेक नव्या अभिनेत्यांनी आॅडिशन दिले होते. मी देखील त्यापैकीच एक होतो. या चित्रपटात संधी मिळेल, याची मला अजिबात आशा नव्हती. परंतु तरी देखील मी पृथ्वी थिएटरबाहेर जाऊन उभा राहिलो. थिएटर बाहेर उभा राहून मी आत पाहत होतो. शशी कपूर झाडांना पाणी देत होते. त्यांनी मला पाहिले आणि आतमध्ये बोलावले. एखाद्या लहान मुलासारखा मी आत गेलो. तुला हा रोल करायचा आहे का? असे त्यांनी मला विचारले. यावर हो बिल्कुल करायचा आहे, असे मी त्यांना म्हणालो. माझे वाक्य पूर्ण होण्याआधी, जा मग, रोल दुस-याला मिळण्याआधी पोहोच, असे ते मला म्हणाले. त्यांचे ते वाक्य ऐकून मी पळत सुटलो. मी या रोलसाठी सिलेक्ट झालो, तेव्हा माझाच विश्वास बसेना. मुंबईत येऊन मला फक्त 3 आठवडे झाले होते आणि रेखा माझी हिरोईन होती.
आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढले...त्यांनी सांगितले, रेखासोबत माझा पहिलाच शॉट लव्ह मेकिंग शॉट होता. गिरीश कर्नाड माझ्याजवळ आलेत. आजचा दिवस खूप खास आहे. तुझा पहिला शॉट रेखासोबत आहे. रेखा खूप प्रोफेशनल अॅक्ट्रेस आहे. तेव्हा तुझे बेस्ट दे. घाबरू नकोस. तिला मिठी मारणे असो की तिच्या जवळ जाणे असो अजिबात संकोच करू नको, असे ते मला म्हणाले आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते...
दिवसभर उशीसोबत प्रॅक्टिस...शूटींग सुरु झाले, मी माझ्या गेटअपमध्ये होतो आणि रेखा माझ्यासमोर. रेखा काही बोलणार, याआधी मी माझे हात पसरवून माझा डायलॉग पूर्ण केला. ते पाहून रेखा अवाक् होती. तिने गिरीश कर्नाडकडे एक कटाक्ष टाकला. ओह माय गॉड... हा तर जराही नर्व्हस नाही. याचा कॉन्फिडन्स तर पाहा, असे त्यांच्याकडे पाहत ती म्हणाली. यावर, त्याने दिवसभर उशीसोबत प्रॅक्टिस केलीये, असे गिरीश कर्नाड म्हणाले. ते पाहून अख्ख्या सेटवर सगळेजण खिदळत होते, अशी एक आठवणही शेखर सुमन यांनी सांगितली.