अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजमध्ये शेखर सुमन यांचीही महत्वाची भूमिका आहे. नुकतंच त्यांनी कतरिना कैफच्या (Katrina Kaif) करिअरबद्दल भाष्य केलं. कतरिना करिअरच्या सुरुवातीच्या काळात कॅमेऱ्यासमोर नीट उभीही राहू शकत नव्हती असं ते म्हणाले. तसंच तिच्या अभिनय आणि भाषेवरही त्यांनी भाष्य केलं.
एका मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, "माझ्या करिअरमध्ये मी सुरुवातीच्या काळात सगळ्या सिनेमांमध्ये हिरो होतो. यानंतर पोस्टरचा आकार छोटा होत गेला. यामुळे मी खूप अस्वस्थ होत होतो. आता लढाई आहे पोस्टर्सला मोठं बनवण्याची. बस हाच माझा प्रवास आहे."
ते पुढे म्हणाले, "इतरांच्या प्रवासाकडे बघून आपण शिकलं पाहिजे. कतरिना कैफलात बघा. तिचा बूम सिनेमा आला होता तेव्हा ती नीट उभीही राहू शकत नव्हती. ना तिला तिचे डायलॉग्स नीट बोलता येत होते. डान्सही करु शकत नव्हती. पण आज बघा कुठे पोहोचली आहे. राजनीति आणि जिंदगी ना मिलेही दोबारा मध्ये तिचा अभिनय पाहा. इतकंच नाही तर धूम 3 मध्ये तिला बघून कोणी यावर विश्वासच ठेवणार नाही की ही मुलगी आधी कशी होती. दीपिका पदुकोणनेही खूप प्रगती केली. अनन्या पांडेलाही आधी खूप ट्रोल केलं गेलं मग तिचा खो गए हम कहाँ सिनेमा आला."
'हीरामंडी' सीरिजचा दुसरा सीझनही लवकरच येणार आहे. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने याची घोषणा केली. नवीन सीझनमध्ये लाहोर, नवाब नाही तर मुंबईतील फिल्म इंडस्ट्री दाखवण्यात येणार आहे.