अभिनेत्री जान्हवी कपूर काही वर्षांपासून बिझनेसमन शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे. जान्हवी अनेकदा शिखरसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तर आथा शिखरही थोडाफार अॅक्टिव्ह झाला आहे. शिखरला नुकतंच एका नेटिझनने 'दलित' असं संबोधलं. यावर त्याने पोस्ट शेअर करत युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
शिखर पहाडियाने गेल्या वर्षी दिवाळीला पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने जान्हवीसोबतही फोटो पोस्ट केला होता. तसंच त्याच्या प्रत्येक फोटोत त्याचे लाडके पाळीव श्वान दिसत आहेत. शिखरने या पोस्टसोबत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टवर एका युझरने कमेंट करत लिहिले,'पण तू तर दलित आहेस'. आता इतक्या महिन्यांनी शिखरने या कमेंटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले, "२०२५ मध्येही इतक्या मागासलेल्या आणि नीच विचारसरणीचे लोकं आहेत. दिवाळी हा सण प्रकाश, विकास आणि एकात्मतेचा आहे. पण हे सगळं तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. विविधतेत एकता आणि सर्वसमावेशक वृत्ती ही भारताची कायमच ताकद राहिली आहे. पण हे समजण्याएवढी बुद्धी तुमच्याकडे नाही. वाईट विचार पसरवण्याऐवजी तुम्ही स्वत:लाच शिक्षित केलं पाहिजे. कारण सध्या तुमचे विचार ही एकच गोष्ट अस्पृश्य आहे."
शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंना तीन मुली आहेत. त्यापैकी स्मृती शिंदे यांचा शिखर मुलगा आहे. शिखरला वीर हा सख्खा भाऊ देखील आहे. वीरने नुकतंच अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवी आणि शिखर कॉलेजपासून सोबत आहेत. तेव्हाच त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. मधल्या काळात त्यांच्यात दुरावा आला होता. मात्र शिखरने हार मानली नव्हती. नंतर जान्हवी शिखरकडे परत आली. आता दोघंही कपल गोल्स देत असतात.