हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने (Richard Gere) एका सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) चुंबन घेतले होते. त्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आरोपमुक्त करण्याच्या दंडाधिकारी यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली. २०१७ मध्ये रिचर्डने एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टीचे चुंबन घेऊन अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दंडाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध केलेला फेरविचार अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी फेटाळला. राजस्थानमध्ये एड्स जागृतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिचर्डने शिल्पाचे चुंबन घेतले. देशाच्या संस्कृतीचा अपमान केल्याचे म्हणत राज्यस्थानमध्ये गेरे व शिल्पाविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण मुंबईत वर्ग केले.
जानेवारी २०२२ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने शिल्पाला आरोपमुक्त केले होते. गेरेच्या कृतीची शिल्पा शेट्टी पीडित असल्याचे दंडाधिकारींनी म्हटले. शिल्पा शेट्टीचे चुंबन घेतले तेव्हा तिने विरोध केला नाही, या आरोपावर दंडाधिकारींनी म्हणाले की, असे असले तरी तिला या घटनेसाठी गुन्हेगार ठरवू शकत नाही.
सरकारी वकील काय म्हणाले?
दंडाधिकारींनी शिल्पा शेट्टीला आरोपमुक्त करून चूक केली आहे. दंडाधिकारींचा निर्णय बेकायदेशीर आहे. तसेच नैसर्गिक न्यायदान तत्त्वाशी विसंगत आहे, असे सरकारी वकिलांनी अर्जात म्हटले होते.
शिल्पाच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
दंडाधिकारी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच निकाल दिला आहे. त्यामुळे सरकारी वकिलांचा फेरविचार अर्ज फेटाळावा, असे शिल्पा शेट्टीचे वकील म्हणाले.