कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. मात्र तिला शेतीचीही तितकीच आवड आहे. याचा अर्थ ती गावात जाऊन शेती करते असा बिल्कुल नाही. तिने आपल्या घराच्या मागे असलेल्या जागेत बाग फुलवली आहे.
तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या बागेत वांगी, पालक, टोमॅटो अशा भाज्या उगवल्या आहेत हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर तिने काही फळेही लावली आहेत.
जास्तीत जास्त भाज्या तिने कुंड्यांमध्ये लावल्या आहेत. या व्हिडीओला तिने फिलोसोफर सिसेरोच असं कॅप्शन दिले आहे. याचाच अर्थ असा की तुमच्याकडे बाग आणि लायब्ररी असेन तर तुमच्याकडे सारं काही आहे. आपल्या या बागेत फळे आणि भाज्या लावल्याचे तिने सांगितले आहे. ही फळं आणि भाज्या शुद्ध असून यावर कोणतंही कीटकनाशक टाकलं नसल्याचंही तिने आवर्जून सांगितले आहे. तसेच मुलासोबत शिल्पा ‘तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं’हे गाणे गात मिरची तोडत असल्याचे पाहायला मिळते आहे. तिने लिहिले- मी चार महिन्यांपूर्वी बिया एका कुंडीत टाकल्या होत्या आणि आता त्यातून वांगी आणि मिरच्याचे पीक आले आहे. म्हणतात ना जसे पेराल तसे उगवेल.
अशी बाग तुमच्या घरात बनवू शकता. हे काम आजच सुरु करा उद्याची वाट पाहू नका असा सल्लाही तिने दिला आहे. सोशल मीडियावर शिल्पाच्या या बागेचं आणि शेतीचं कौतुक होत आहे. इतकंच नाही तर फॅन्स तिच्याकडून टीप्स मागत आहेत.