बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि तिचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) यांच्या अडचणी संपता संपत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पाचा पती तुरुंगातून बाहेर आला आणि आता मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा आणि राज यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोर्नोग्राफी प्रकरणात पतीला अटक झाली तेव्हा शिल्पा त्यावर काहीही बोलली नव्हती. पण या फसवणुकीच्या प्रकरणानंतर मात्र तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्वीट करत तिने यावरची प्रतिक्रिया मांडली आहे. (Shilpa Shetty reacts to cheating and fraud complaint)
नेमकं प्रकरण काय?
नितीन बराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 2014 पासून फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. बराई यांच्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आयपीसी 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करू शकतात. तसेच या प्रकरणी राज आणि शिल्पाशी पोलीस संपर्क साधण्याची शक्यता आहे. शिल्पा आणि राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल, या आशेने बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, बराई यांच्या आरोपानुसार, या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना धमकी देखील देण्यात आली. राज कुंद्रा याला गेलसर जुलैमध्ये पॉर्न फिल्म बनविल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या आरोपाखाली राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.