कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे. तिनेच ट्वीट करून ही माहिती तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या परिने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेन... आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला तोंड देऊया...
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.