Join us

'तिने माझा संसार मोडला'; राज कुंद्राच्या एक्स पत्नीने केला होता शिल्पावर गंभीर आरोप, अभिनेत्रीनेही दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 12:59 PM

Shilpa Shetty: शिल्पा आणि राज या जोडीने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर कविताने राज आणि शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते.

बॉलिवूडमधील पॉवरफूल कपल म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याकडे पाहिलं जातं. कितीही अडीअडचणी आल्या तरी सुद्धा ही जोडी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहात असल्याचं दिसून येतं. राजचं हे दुसरं लग्न असून शिल्पा पूर्वी त्याने कवितासोबत लग्न केलं होतं. मात्र, कविताला घटस्फोट देत त्याने शिल्पासोबत दुसरा संसार थाटला. परंतु, या लग्नामुळे कविता नाराज झाली होती. इतकंच नाही तर तिने शिल्पावर तिच्या संसार मोडल्याचा आरोपही केला होता.

शिल्पा आणि राज या जोडीने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर कविताने राज आणि शिल्पावर अनेक गंभीर आरोप केले होते. कविताने डेली मेलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने शिल्पावर टीकास्त्र डागलं होतं.

"जेव्हा मी  राजबरोबर गप्पा मारायचे त्यावेळी तो कायम शिल्पाबद्दलच बोलायचा. त्यामुळे त्याला माझ्यापेक्षा नक्कीच कोणीतरी चांगली व्यक्ती भेटलीये हे कळलं होतं", असं कविताने मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. सोबतच 'शिल्पामुळे माझा संसार मोडला', असंही ती म्हणाली होती. कविताच्या या वक्तव्यावर शिल्पानेही तिच्याच शब्दांत उत्तर दिलं. शिल्पाने 'हॅलो मॅगझी'नला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने कविताने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

"मी राजला स्पष्टपणे ताकीद दिली होती की जोपर्यंत तो घटस्फोट घेत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी लग्न करणार नाही. आपल्यात फक्त मैत्री राहील.  मी कधीच कोणाचं घर, संसार मोडला नाही. माझ्यासाठी हे शब्द वापरणं खूप चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टीचा माझ्या आई-वडिलांना त्रास झाला होता आणि मला खूप वाईट वाटलं होतं," असं शिल्पा म्हणाली.

टॅग्स :बॉलिवूडराज कुंद्राशिल्पा शेट्टीसेलिब्रिटीसिनेमा