बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणीत गेल्या 19 जुलैला अटक केली आणि शिल्पा अडचणीत आली. पतीला अटक झाल्यापासून शिल्पा सतत चर्चेत आहे. तिच्यावरही अनेक आरोप होत आहेत. सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. आत्तापर्यंत शिल्पानं यावर मौन बाळगलं होतं. पण आता तिनं ट्विटरवर एक स्टेटमेंट (Shilpa Shetty statement )जारी केलं आहे. माझ्या नावावर खोट्या बातम्या पेरू नका, अशी विनंती तिनं या स्टेंटमेंटद्वारे केली आहे.
शिल्पा म्हणते...हो, गेले काही दिवस अडचणींचे होते. आमच्यावर अनेक आरोप झालेत. अनेक अफवा पसरवल्या गेल्यात. मीडिया आणि माझ्या ‘शुभचिंतकांनी’ माझ्याबद्दलही अनेक गोष्टी पेरल्या. मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही सध्या ट्रोल केलं जातंय. मी एवढंच सांगू इच्छिते की, मी अद्याप या प्रकरणावर काहीही बोललेली नाही आणि पुढेही मौन बाळगणार आहे. तेव्हा माझ्या नावाने खोट्या अफवा व प्रतिक्रिया देऊ नका. एक सेलिब्रिटी या नात्यानं माझं एक तत्त्व आहे. कधीही तक्रार करू नका आणि कधीही स्पष्टीकरण देऊ नका. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की, तपास सुरू आहे. मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. आम्ही कायदेशीर मदत घेत आहोत. पण तोपर्यंत विशेषत: एक आई या नात्यानं मी विनंती करते की, अर्धवट माहितीच्या आधारावर आणि सत्य न तपासता प्रतिक्रिया देणं बंद करा. मी कायद्याचं पालन करणारी आणि गेल्या 29 वर्षांपासून काम करणारी एक प्रोफेशनल महिला आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कधीही कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. माझं कुटुंब व माझ्या खासगीपणाचा आदर करा आणि सध्या आम्हाला एकटं सोडा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपा करून कायद्याला त्याचं काम करू द्या, सत्यमेव जयते...., असं शिल्पानं तिच्या निवेदनात म्हटलं आहे.गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी शिल्पाचीही चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अद्याप तिला क्लिनचीट दिलेली नाही.