बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस व स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. ते म्हणजे ती लवकरच रेडिओवर पदार्पण करणार आहे. ती महाभारतातील द्रौपदीच्या पात्राला आवाज देणार आहे.
शिल्पा म्हणाली की बालपणी आपल्याला टेलिव्हिजनवर फक्त बी.आर. चोप्रा यांची महाभारत मालिका बघण्याचीच संधी होती. माझी नेहमीच अध्यात्माकडे ओढ असते. द्रौपदी खूप सुंदर व आयकॉनिक भूमिका आहे आणि मी खूप खूश आहे कारण त्या पात्राला माझा आवाद देत आहे. हे चित्रपटापेक्षा खूप वेगळे काम आहे. कारण मी फक्त डबिंगमध्ये सहभागी असणार आहे. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव ठरणार आहे. शिल्पा जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईकडून तिला महाभारत मालिकेबद्दल समजले होते. शिल्पा द्रौपदीच्या वस्त्रहरण दृश्यावेळी रडायला लागली होती. ती म्हणाली की आता माझ्या मुलाने पांडव व कौरवांच्या कथा ऐकाव्यात. ज्याप्रकारे मी ऐकत मोठी झाले आहे. शिल्पाला अध्यात्माबद्दल आसक्ती असून ती तिच्या सहा वर्षांचा मुलगा वियानला महाकाव्य आणि पौराणिक कथा सांगत असते.रेडिओ ऐकण्याबद्दल शिल्पा म्हणाली की, बारा वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही कारमध्ये म्युझिक ऐकण्यासाठी सीडी ठेवत होतो. पण, आता कारमध्ये रेडिओ चॅनेल ऐकतो. प्रवासादरम्यान मी जास्त रेडिओ ऐकते आणि असे बरेच लोक करतात. हा शो या सर्व लोकांपर्यंत पोहचेल.