अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्री वादाच्या भोव-यात सापडली आहे. सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकर जबाबदार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. बॉलिवूड हे केवळ घराणेशाहीवरच चालते हे सिद्ध करण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत त्यांच्या बरोबर घडलेल्या घटनानांचा खुलासा करत आहेत. घराणेशाहीचा फटका खिलाडी अक्षय कुमारलाही सहन करावा लागला होता. खुद्द अक्षय कुमारनेच याबाबत खुलासा केला होता. करिअरच्या सुरूवातीला अक्षयलाही सिनेमांच्या ऑफर यायच्या सगळे काही बोलणी झाल्यानंतर अचानक त्याला कळायचे की तो या सिनेमासाठी कामच करणार नाही.
'फुल और काटे' सिनेमासाठी अक्षय कुमारला साईन करण्यात आले होते. मात्र अचानक त्याच्याकडून हा सिनेमा काढला गेला. सिनेमासाठी अक्षय कुमारने खूप मेहनत घेतली होती. भूमिकेसाठी त्याची जोरावर तयारी सुरू होती. सिनेमाची संपूर्ण प्रोसेस अक्कीने जवळून पाहिली होती. पण अचानक सकाळी त्याला फोन आला. त्याला जे काही सांगण्यात आले हे ऐकून तर अक्कीच्या पाया खालची जमीनच घसरली होती. उद्यापासून तू शूटिंगसाठी येऊ नको. तुझ्या भूमिकेसाठी दुस-या हिरोची निवड करण्यात आली आहे. आणि हा दुसरा अभिनेता होता अजय देवगन.
अक्षयला मिळालेली भूमिका अजयने साकारली. अजय देवगनचे बॉलिवूडमध्ये खूप चांंगले रिलेशन होते. अजय देगनचे वडिल बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध स्टंटमन होते. वीरू देवगन असे त्यांचे नाव. वीरू देवगन यांच्या ओळखीवर अजय देवगनला सिनेमात घेण्यात आले. त्यावेळी अक्षय कुमारचा इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नव्हता.
आज सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. इतकं मानधन घेऊनही तो त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. इतकंच नाही तर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान आहे.
त्यामुळे आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.