Join us

Shocking !! राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चित्रपटांच्या प्रिंट्सला फुटले पाय! ९२ हजार प्रिंट्स गायब!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 8:58 AM

पुण्यातील ‘नॅशनल फिल्म्स आरकाइव आॅफ इंडिया’(एनएफएआय) अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून तब्बल ९२ हजार चित्रपटांच्या प्रिंट्स गायब असल्याचे प्रकरण समोर ...

पुण्यातील ‘नॅशनल फिल्म्स आरकाइव आॅफ इंडिया’(एनएफएआय) अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून तब्बल ९२ हजार चित्रपटांच्या प्रिंट्स गायब असल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात ख्यातनाम भारतीय दिग्दर्शकांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसह काही विदेशी चित्रपटांच्या प्रिंट्सचाही समावेश आहे.२०१० मध्ये एनएफएआयने पुण्याच्या एका फर्मला आपल्या सर्व रिल्सवर बायकोड लावण्याची जबाबदारी सोपवली होती. तसे हे कामही सुरु झाले. पण यादरम्यान हजारो रिल्स गायब असल्याचे संबंधित फर्मच्या लक्षात आले. या हजारो रिल्स आॅन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. मात्र प्रत्यक्ष संग्रहालयातून त्या गायब आहेत. फर्मने यांसदर्भात एक अहवाल तयार आहे. त्यानुसार, रिल्सचे ५१५०० डबे आणि ९२००० प्रिंट्स गायब आहेत. कदाचित ही गोष्ट गावी नसल्याने आमच्याकडे १.३ लाख चित्रपटांचे रिल्स असल्याचा दावा एनएफएआय करत आली आहे. ४९२२ डब्यांत १११२ चित्रपटांचे टायटल आहेत. पण उपलब्ध असूनही एनएफएआयच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नाही. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीतही एनएफएआयमधून अनेक प्रिंट्स गायब असल्याचे उघड झाले आहे. या गायब झालेल्या सेल्यूलॉईड प्रिंट्समध्ये सत्यजित रे (पाथेर पंचाली), मेहबूब खान (मदर इंडिया), राज कपूर (मेरा नाम जोकर, अवारा), मृणाल सेन(भुवन शोम), गुरु दत्त (कागज के फूल) अशा अनेक दिग्गजांच्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक इंटरनॅशनल सिनेमांच्या प्रिंट्सलाही पाय फुटले आहेत. बॅटलशिप पोटेमकिन, बायसिकल थीफ, सेवन समुराय (अकीरा कुरोसावा दिग्दर्शित), नाइफ इन द वॉटर आदींचा समावेश आहे. शंभरपेक्षा अधिक मूक चित्रपटांच्या प्रिंट्सही गायब आहेत. केवळ इतकेच नाही तर स्वातंत्र्यापूर्वीचे काही फुटेजही संग्रहालयात नाहीत.इतका अमूल्य ठेवा संग्रहालयातून कसा गायब झाला? त्याला कसे पाय फुटले, तूर्तास हे गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा कसा छडा लावला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.