अमेरिकेतील एका प्रतिष्ठीत मीडिया आणि एण्टरटेन्मेंट फर्ममधून प्रियंका चोप्रा, लेडी गागा, मैडोना, निकी मिनाज व ब्रुस प्रिरंगस्टीन यांसारख्या बऱ्याच सेलिब्रेटींचा खासगी डेटा चोरीला गेला आहे. काही अज्ञात हॅकर्सने सेलिब्रिटींचे फोन, इमेल आयडी, सोशल मीडिया अकाउंट, फोन रेकॉर्ड्स हॅक करुन त्यांची संपूर्ण माहिती चोरी केली आहे. Variety.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार जवळपास 756 जीबीची माहिती चोरी झाली आहे. या सायबर अटॅकमुळे हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेतील सायबर सुरक्षा विभाग या हल्ल्याचा तपास करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सने रॅन्समवेअर व्हायरसचा वापर केला आहे. तसेच त्यांनी दोन कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्सची मागणी केली आहे. जर हे पैसे लवकरात लवकर त्यांना मिळाले नाही तर सेलिब्रिटींची सर्व माहिती डार्क वेबवर व्हायरल केली जाईल अशी धमकी देखील या हॅकर्सने दिली आहे.
इंटरनेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी रॅन्समवेअरचाच वापर करुन अमेरिकेतील रुग्णालयांवर सायबर अटॅक करण्यात आला होता. त्यानंतर होणारा हा सर्वात मोठा हल्ला आहे.