सोशल मीडियावर सध्या एका गायिकेची जोरदार चर्चा आहे. तिच्या सुरेल आवाजातलं 'अंकुश' सिनेमातलं गाणं 'इतनी शक्ति हमें देना दाता'असं काही सुपरहिट झालं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. आजही हे गाणे तितकेच प्रसिद्ध असून सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असे हे गाणं आहे. आजही शाळेत प्रार्थना म्हणून हेच गाणे लावले जाते. हे प्रसिद्ध गाणं गायलंय गायिका पुष्पा पगधरे यांनी.
आजही युट्युबवर तुम्ही हे गाणे सर्च केले तरी ३ करोडहून अधिक व्हु्युज या गाण्याला मिळालेल दिसतील. २०१७ मध्ये पुष्पा पगधरे यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता.पुष्पा यांनी 'खुन का बदला', 'बिना माँ के बच्चे', 'मुक्कदर का सिकंदर' अशा अनेक सिनेमांमध्येही गाणी गायली आहेत. त्याचबरोबर तसेच त्यांनी मराठी, भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 'इतनी शक्ति हमें देना दाता' म्हणत सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या गायिका पुष्पा पगधरे मात्र उपेक्षितच असल्याचे समोर आले आहे. पुष्पा पगधरे यांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे आज त्यांच्या वाट्याला उपेक्षिताचं जीणं जगणंच आले आहे.
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना इतरांचा आधार घ्यावा लागत आहे. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना आज कसरत करावी लागत आहे. त्यांनीच गायलेल्या गाण्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई इतरांना मिळत आहे. मात्र यातला कोणत्याही प्रकारचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. इतकेच काय तर राज्य सरकारकडून देण्यात येणारे पेन्शनही फक्त 3150 रुपये मिळतात. ही रक्कमही वेळेवर मिळत नाही.
गेल्या ३५ वर्षांत एकही म्युझिक कंपनीने त्यांना रॉयल्टीच्या रुपात एकही रुपया दिलेला नाही. वयाच्या ८० व्या वर्षी पुष्पा पगधरे यांच्यावर नियतीने हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय. माहिम येथे मच्छीमार कॉलोनीत त्या राहतात.अशा या हलाखीच्या परिस्थितीत नातेवाईकच त्यांना वेळप्रसंगी मदत करतात.
सरकारकडून कोणत्याच प्रकारची मदतही त्यांना मिळाली नाही. घराचीही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. 1989 मध्ये सरकारकडून त्यांना घर दिले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र या गोष्टीला ३२ वर्ष झाली सरकारनेही याकडे लक्ष दिले नाही. आमच्यासारख्या निराधार कलाकारांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, पुष्पा पगधरे यांनी राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे यांनी लिहीलेल्या गीतांसाठीही आपला आवाज दिला आहे..मोहम्मद रफी यांच्यासोबतही त्यांनी गाणी गायली आहेत. जर मला आधीच काहीतरी रॉयल्टीच्या रुपात रक्कम मिळाली असती तर आज माझ्या वाट्याला हलाखीचं जगणं आले नसते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
काम सुटलं, अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली.आजच्या गायकांना गलेलठ्ठ रक्कम दिली जाते. पूर्वी एका गाण्यासाठी त्यांना फक्त २५० इतकेच मिळायचे. कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं. यांत पुष्पा पगधरे यांच्याही नावाची भर पडली आहे.