बऱ्याचदा सेलिब्रेटींच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे पहायला मिळते. त्यात आता लखनऊमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. लखनऊ पोलीस या प्रकरणाचा छडा लावला आहे. शिल्पा शेट्टीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या विरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी हजरतगंजमधील एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांवर खटला दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी किरण बाबाने मिदासदीप एंटरप्राइजच्या संचालकाकडून फ्रेंचायजी फीजच्या नावाखाली काही पैशांची गुंतवणूक करून घेतली होती. त्याच्याकडून गुंतवणूकदाराला असे सांगण्यात आले होते की, त्याची ब्रँड एम्बेसिडर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. किरण बाबाने शिल्पा शेट्टीचे अनेक फोटो आणि बॅनर्सचा प्रचार देखील केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्याने अशी देखील माहिती दिली की, त्याला असे सांगण्यात आले होते की स्वत: शिल्पा शेट्टी देखील वेळोवेळी त्याठिकाणी येऊन पाहणी करते. त्यामुळे त्याने किरण बाबाबरोबर पार्टनरशीप केली, मात्र नेहमी यामध्ये त्याला नुकसान सहन करावे लागले. सतत नुकसान होत असल्यामुळे पीडित व्यक्तीने चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याला या फसवणुक झाल्याचे समजले. पीडित व्यक्तीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात भा.द.वी. कलम 408, 420 आणि 506 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
हसरतगंजचे सहायक पोलीस आयुक्त अभय कुमार मिश्रा यांनी माहिती दिली की, एओसिस स्पा अँड वेलनेस कंपनीचा एमडी आणि डायरेक्टरसह अन्य काही लोकांविरोधात विभूतीखंड पोलीस ठाण्यातही ही खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.