Join us  

‘शोले’तील ‘इत्तूसा’ रोल पाहून ढसाढसा रडले होते मॅक मोहन... त्याच रोलने बदलले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:10 PM

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील अनेक कलाकार आज या जगात नाहीत. यापैकी एक म्हणजे सांबा अर्थात अभिनेते मॅक मोहन.

ठळक मुद्दे10 मे 2010 रोजी वयाच्या 72व्या त्यांनी जगाचा निरोप घेतला.

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील अनेक कलाकार आज या जगात नाहीत. यापैकी एक म्हणजे सांबा अर्थात अभिनेते मॅक मोहन. 1938 साली आजच्या दिवशी म्हणजे 24 एप्रिलला जन्मलेल्या मॅक मोहन यांना आजही सगळेच सांबा या नावाने ओळखतात. ‘शोले’तील त्यांच्या तोंडचा ‘पूरे पचास हजार’ हा उणापुरा तीन शब्दांचा संवाद लोकांना असा काही भावला की, सांबा हे पात्र अमर झाले. या एका संवादानंतर लोक त्यांचे खरे नाव विसरून त्यांना सांबा नावाने ओळखू लागले. खरे तर मॅक मोहन यांनी डॉन, कर्ज, सत्ते पे सत्ता, जंजीर, रफूचक्कर, शान, खून पसीना अशा अनेक चित्रपटांत काम केले. पण त्यांना खरी ओळख दिली ती ‘शोले’ने.

मॅक मोहन यांना खरे तर क्रिकेटर बनायचे होते. त्यांनी काही स्पर्धा खेळल्याही. पण कदाचित नशीबात कलाकार होणे लिहिलेले असावे, त्यानुसार ते अ‍ॅक्टर झाले. थिएटरमध्ये शौकत कैफी यांनी मॅकची अदाकारी बघून त्यांचे कौतुक केले. आता मोठा पडदा तुझ्यासाठी दूर नाही, असे ते जाता जाता मॅकला म्हणाले. पुढे झालेही तसेच.

मॅक यांना महागडे कपडे आणि परफ्युमची प्रचंड आवड होती. शिवाय वाचनाही त्यांना अतोनात छंद होता.

‘शोले’ हा तीन तासांचा सिनेमा होता. पण या तीन तासांच्या चित्रपटात मॅक यांच्या वाट्याला केवळ एक संवाद आला. तो ‘पूरे पचास हजार’. वाचून आश्चर्य वाटेल पण या एका संवादासाठी मॅक मोहन यांना मुंबई ते बेंगळुरु असा 27 वेळा प्रवास करावा लागला होता.

‘शोले’त आधी त्यांची भूमिका थोडी मोठी होती. पण एडिट झाल्यावर त्यांच्या वाट्याला केवळ तीन शब्दांचा संवाद तेवढा उरला. यामुळे मॅक मोहन कमालरचे निराश झाले होते. इतके की, चित्रपट पाहिल्यानंतर ते अक्षरश: ढसाढसा रडू लागले होते. त्यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, ‘चित्रपट बघून मी अक्षरश: रडलो होतो. इतकी छोटी भूमिका बघून मला रागही आला होता. मी थेट रमेश सिप्पींकडे गेलो. इतकाच शॉट का ठेवला, तो पण काढून टाका, असे मी रागारागात त्यांना म्हणालो. मी रागात होतो. पण रमेश सिप्पी एकदम शांत. चित्रपट हिट झाला तर अख्खे जग तुला सांबा नावाने ओळखेल, एवढे एकच वाक्य ते बोलले. मला माहित नाही रमेश सिप्पी असे का म्हणाले होते. पण त्यांचे शब्द अक्षरश: खरे ठरले.  ‘शोले’ रिलीज झाल्यानंतर मी अमेरिकेत फिरायला गेला होतो. न्यूयॉर्कमध्ये फिरत असताना तेथील एका अधिका-याने मला दूरून सांबा म्हणून हाक दिली होती. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही...’

एकदा पुण्यात मॅक मोहन गेले आणि गर्दीने त्यांना पाहून सांबा...सांबा... म्हणून ओरडणे सुरु केले. ते पाहून मॅक मोहन स्वत: अचंबित झाले होते. तीन शब्दांचा संवाद आपल्याला इतके लोकप्रिय बनवेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.  10 मे 2010 रोजी वयाच्या 72व्या त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :मॅक मोहन