बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंग चड्ढाचे दिल्लीत शूटिंग करतो आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूरने सोशल मीडियावर घोषणा केली होती की तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यात असं समजते आहे की आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेल्या एका सूत्रांनी सांगितले की, काही अॅक्शन दृश्यांच्या शूटिंगदरम्यान आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. मात्र यामुळे शूटिंगमध्ये कोणतीच अडसर आली नाही. आमिर खानने काही कालावधीतच औषधांच्या मदतीने पुन्हा शूटिंगला सुरूवात केली आहे.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.