'आशिकी २' ची लोकप्रिय जोडी आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक मोहित सुरी या जोडीला स्क्रीनवर घेऊन येणार आहेत अशी चर्चा आहे. एका रोमँटिक सिनेमात त्यांची वर्णी लागली आहे. याआधी श्रद्धा आणि आदित्यने 'ओके जानू' हाही सिनेमा केला होता. दोघांच्या अफेअरची आणि नंतर ब्रेकअपची चर्चा झाली. यानंतर ते पुन्हा सोबत दिसले नाहीत. पण आता 'आशिकी २'चे दिग्दर्शक मोहित सुरीच दोघांना परत घेऊन येत आहेत.
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, मोहित सुरीच्या रोमँटिक सिनेमात आदित्य आणि श्रद्धा दिसणार आहेत. सध्या सिनेमाच्या फायनल डिटेल्सचं काम सुरु आहे. दोघंही सिनेमा करण्यासाठी आतुर आहेत. स्क्रीनप्ले आणि कथेवर मोहित सुरी आणि क्रिएटिव्ह टीम काम करत आहे. येत्या काही दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.
आता चाहतेही दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. मोहित सुरी यांच्या सिनेमाची कथा, यातील गाणी ही नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिली आहेत. त्यामुळे आता ते पडद्यावर आणखी काय जादू घेऊन येतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यांनी आतापर्यंत 'आशिकी २', 'एक व्हिलन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हमारी अधुरी कहानी' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
श्रद्धा आणि आदित्यने 'आशिकी २' नंतर २०१७ साली 'ओके जानू' सिनेमा केला. शाद अली यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा फारसा चालला नव्हता. मात्र श्रद्धा-आदित्यची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. नंतर दोघंही आपापल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाले. श्रद्धाने 'स्त्री2' सारखा ब्लॉकबस्टर हिट दिला. तर आदित्यने 'द नाईट मॅनेजर' सीरिजमध्ये काम केलं.