श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूडची ब्लॉकबस्टर 'स्त्री' बनली आहे. तिच्या 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला. ८०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. श्रद्धा कपूर मोजक्याच सिनेमांमध्ये दिसते पण तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं. तसंच खऱ्या आयुष्यातही आपल्या साधेपणाने तिने सर्वांचं मन जिंकलं आहे. पण आपली ही स्त्री लग्न कधी करणार या चर्चा नेहमीच होतात. श्रद्धा राहुल मोदीला डेट करत होती. मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. आता परत श्रद्धा आणि राहुल यांचं पॅचअप झाल्याचं दिसत आहे. श्रद्धानेच तसा फोटो शेअर केला आहे.
गेल्या वर्षी श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमा आला होता. या सिनेमाचा लेखक होता राहुल मोदी. श्रद्धा आणि राहुल एकमेकांना डेट करायला लागले. अंबानींच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये श्रद्धा त्याच्यासोबत दिसली होती. तसंच दोघांच्या हिमालयातील ट्रीपचेही फोटो समोर आले होते. मात्र अचानक श्रद्धाने राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. आता चार महिन्यांनंतर श्रद्धाच्या सोशल मीडियावरील स्टोरीमुळे या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तिने हातात वडापाव घेत फोटो शेअर केला आहे. यात तिने राहुल मोदीला टॅग करत लिहिले, 'मी कायमच तुझ्याकडे वडापावचा हट्ट करेन.'
श्रद्धा कपूरला वडापाव किती प्रिय आहे हे तर तिच्या चाहत्यांना माहितच आहे. मात्र तिची ही वडापाव डेट राहुल मोदीसोबत आहे हे बघून तिने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविरामच दिला आहे. आता श्रद्धा तिचं हे नातं कधी अधिकृत करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.