Join us

तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीनच्या 'लूप लपेटा'मध्ये झळकणार श्रेया धन्वंतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:05 IST

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी ही आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’ मध्ये तापसी आणि ताहिर राज भसीन बरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

“स्कॅम 1992” आणि “फॅमिली मॅन” या दोन्ही वेबसीरिजमध्ये काम केल्यानंतर आता श्रेया धन्वंतरी नाव प्रत्येक घराघरात पोहचले आहे. तापसी आणि ताहिर म्हणजेच सावी आणि  सत्या यांच्या भूमिकांशी जुळण्यासाठी निर्माते लोकप्रिय आणि सशक्त ॲक्टर शोधत होते आणि पूर्वी एलिप्सिस एंटरटेनमेंट बरोबर काम केल्यामुळे निर्मात्यांना श्रेयाच्या अभिनय कौशल्याची प्रचिती होतीच आणि त्यामुळेच त्यांनी लगेचच जुलियाच्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड केली.  

श्रेया धन्वंतरी म्हणाली की, "या चित्रपटात काम करण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणे होती. मला दिलेली व्यक्तिरेखा इतकी रंजक होती की मला नाकारता आले नाही. मी माझे पहिले पाऊल तनूज आणि अतुल यांच्यासमवेत एलिप्सिस मधून उचलले होते. या चित्रपटाचे शीर्षक ही आकर्षक आहे. मला नेहमीच काहीतरी नवीन व क्रेझी करायचे होते जे लूप लपेटामध्ये आहे. "

लूप लपेटा सिनेमा एक कॉमिक थ्रिलर सिनेमा आहे. मेंकिगपासूनच हा चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट १९९८ साली रिलीज झालेला जर्मन सिनेमा रन लोला रनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा अभिनेत्रीभोवती फिरते जी आपल्या बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी वीस मिनिटांत पैशांची व्यवस्था करते.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया , एलिप्सिस एण्टरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर), आयुष महेश्वरी द्वारा निर्मित आणि  आकाश भाटिया द्वारा दिग्दर्शित ‘लूप लपेटा’ हा  चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नू