Join us  

Shreyas Talpade : "मी जिवंत आहे"; अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूची अफवा, पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 9:15 AM

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल सोशल मीडियावर एक खोटी पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला.

अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल सोशल मीडियावर एक खोटी पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. श्रेयस तळपदेला या फेक न्यूजची माहिती मिळताच, अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तो जिवंत, आनंदी आणि निरोगी असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच अभिनेत्याने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

"मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत आहे, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मला समजतं की मजा-मस्करी गरजेची आहे, परंतु जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरं नुकसान होऊ शकतं. जोक म्हणून सुरू झालेल्या गोष्टीमुळे आता अनावश्यक त्रास निर्माण झाला आहे. खासकरून माझे कुटुंबीय, माझी काळजी असलेले लोक त्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे."

"'मला लहान मुलगी आहे, जी दररोज शाळेत जाते, ती माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असते आणि सतत प्रश्न विचारते आणि मी बरा आहे हे जाणून घेत असते. या खोट्या बातम्या तिला जास्त दुःखी करतात आणि त्याला अधिक प्रश्न विचारण्यास भाग पाडतात. जे लोक अशा प्रकारचा मजकूर टाकत आहेत त्यांनी ते थांबवावं आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. काही लोक खरोखर माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. पण अशा प्रकारे मजा-मस्करीचा वापर होणं हे हृदयद्रावक आहे."

'फक्त टार्गेट केलेल्या व्यक्तीलाच याचा फटका बसत नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेले लोक जसं की त्याचं कुटुंब आणि विशेषत: लहान मुलं ही परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कृपया हे थांबवा. अशी मस्करी कोणाचीच करू नका. तुमच्यासोबत असं व्हावं हे मला वाटत नाही, त्यामुळे कृपया संवेदनशील व्हा" असं श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वेलकम टू द जंगलच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता तो पूर्णपणे बरा आहे. 

टॅग्स :श्रेयस तळपदेबॉलिवूड