मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेलाहृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत सगळ्यांना चिंता जाणवत होती. 'वेलकम टू द जंगल' सिनेमाच्या शूटिंगनंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती होती. आता बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने श्रेयसच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
बॉबी देओलने 'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. "मी श्रेयसच्या पत्नीशी बोललो. ती खूप अस्वस्थ वाटत होती. त्याचं हृदय १० मिनिटांसाठी बंद पडलं होतं. पण, आता त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया," असं बॉबी देओल म्हणाला.
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. "श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. काही दिवसांमध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या गोष्टी खासगी ठेवण्यात सहकार्य कराल. तुमचं प्रेम आणि पाठिंबा हिच आमच्या दोघांची ताकद आहे.", असं दीप्तीने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
नेमकं काय घडलं?
श्रेयस तळपदे त्याच्या आगामी 'वेलमक टू जंगल' सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.